साठ वर्षांनंतर इटली विश्वकरंडक पात्रतेत गारद

Italy football team
Italy football team

मिलान : साठ वर्षांत प्रथमच इटली विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेस पात्र ठरली नाही. इटली यापूर्वी 1958 च्या स्पर्धेसाठी पात्र ठरले नव्हते, त्या वेळी स्पर्धा स्वीडनमध्ये झाली होती, तर आता 2018 च्या स्पर्धेस इटली अपात्र ठरली. या वेळी त्यांचे आव्हान स्वीडनने संपवले. 

चार वेळच्या विजेत्यांनी स्वीडनमधील लढत 1-0 गमावली होती. त्यामुळे घरच्या मैदानावर त्यांना लढत टायब्रेकरला नेण्यासाठी किमान एक गोल करण्याचे आव्हान होते; पण गोलरक्षक रॉबिन ऑल्सेन याने इटलीची सर्व आक्रमणे विफल ठरवली. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत इटलीचा खेळ कमालीचा उंचावला होता; पण स्वीडनचा बचाव चांगलाच भक्कम होता. त्यामुळे परतीची लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. अखेर या लढतीत पहिल्या टप्प्यात स्वीडनने मिळविलेला विजय निर्णायक ठरला. त्यांनी ही लढत 1-0 अशी जिंकली. 

इटली आक्रमणात सरस होती; पण स्वीडन प्रतिआक्रमणात प्रभावी होते. त्यांना गोलच्या किमान दोन संधी नाकारण्यात आल्या; मात्र इटलीच्या गच्छंतीनंतर ही चर्चा जास्त झालीच नाही. त्यांचे मार्गदर्शक गिआन पिएरो व्हेंचुरा यांच्याऐवजी कोण, ही चर्चा सुरू झाली. त्यांनी लॉरेंझा इनसिग्ने याला बाहेर ठेवल्याचा कसा फटका बसला, हेच जास्त चर्चेत आहे. 

सुमारे दीड वर्षापूर्वी इटली युरो स्पर्धेत उपउपांत्यपूर्व जर्मनीविरुद्ध शूटआउटवर पराजित झाले होते; पण इटली त्यापासून प्रेरणा घेऊ शकली नाही. बचावात सरस मानली जात असलेल्या इटलीस स्वीडनची आक्रमणे परतीच्या लढतीत सतावत होती. स्वीडनचा काहीसा धसमुसळा खेळही इटलीची डोकेदुखी झाली. त्याची कारणे आता असंख्य दिली जातील. एक मात्र खरे तब्बल पावणेदोनशे लढती खेळलेल्या इटली गोलरक्षक गिआनलुईगी बफॉन याच्या कारकिर्दीची अपेक्षित सांगता झाली. 
सॉरी, मी संघाच्या वतीने माफी मागत आहे. माझ्या अखेरच्या सामन्यात इटली पराजित झाली आणि विश्वकरंडकास पात्र ठरू शकली नाही, हे मला कायम सलत राहील, असे त्याने सांगितले. 

आमच्या भावना नेमक्‍या काय आहेत, हे सांगणे अवघड आहे. या लढतीने आमची सरस सांघिक कामगिरीच दाखवली. आमचा स्टार आक्रमक झॅल्तन इब्राहिमोविक निवृत्त झाल्यावर काय, असे विचारले जात होते; पण त्यानंतर खेळात केलेले बदल यशस्वी ठरत आहेत. 
- यान अँडरसन, स्वीडन मार्गदर्शक 

ही आहे इटली 
- चार वेळा जगज्जेते, तर दोनदा उपविजेते 
- इटली एकदा तिसऱ्या क्रमांकावर; तर एकदा चौथ्या 
- सर्वाधिक वर्ल्डकप खेळण्याच्या युरोपीय क्रमवारीत आत्तापर्यंत जर्मनी आणि इटली 18 सहभागासह अव्वल होती 
- जर्मनीचा 19 व्या स्पर्धेतील सहभाग नक्की, इटली स्पर्धेबाहेर 
- माजी विजेत्यांपैकी केवळ इटलीच 2018 च्या स्पर्धेबाहेर 
- वर्ल्डकप ग गटाच्या पात्रतेत दुसरे, आघाडीवरील स्पेनने पाच गुणाने मागे टाकले होते 

दरम्यान, स्वीडन 
- 2006 नंतर प्रथमच विश्वकरंडकास पात्र 
- 2018 च्या प्ले ऑफमधील पहिला धक्कादायक विजय नोंदवल्याचा मान 

दृष्टिक्षेपात लढत 
तपशील इटली स्वीडन 
वर्चस्व 76% 24% 
शॉट्‌स 27 4 
ऑन टार्गेट 6 1 
कॉर्नर्स 8 0 
फाउल्स 17 16 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com