देशासाठी खेळताना मानधन कशाला : एम्बापेचा दिलदारपणा

वृत्तसंस्था
Monday, 2 July 2018

"देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पैशाची गरज नसते अशी एम्बापेची विचारसरणी आहे. तो खराखुरा 'लिजंड' आहे,''

रशिया : फ्रान्सचा किलीयन एम्बापे विश्‍वकरंडक स्पर्धेतून होणारी सारी कमाई एका सेवाभावी संस्थेला देणगी देणार आहे. "प्रेईरेस डे कॉर्डेस' असे नाव असलेली ही संस्था व्यंग असलेल्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करते. या संस्थेचा "ब्रॅंड ऍम्बेसिडर' असलेल्या एम्बापेची ही कृती कौतुकाचा विषय ठरली आहे. 19 वर्षीय एम्बापे गेल्या वर्षी जगातील सर्वांत "मूल्यवान' फुटबॉलपटू बनला.

मोनॅकोहून तो तब्बल 166 दशलक्ष पौंड रकमेच्या करारावर पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) क्‍लबशी करारबद्ध झाला. या स्पर्धेत त्याने आपली 'पत' सार्थ ठरवीत गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले. 'एल एक्वीपे' दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार एम्बापेने स्पर्धेआधीच हा निर्णय घेतला. त्याला सामन्यागणिक 20 हजार युरो (सुमारे 16 लाख रुपये) इतकी कमाई होते. याशिवाय बोनस वेगळा असतो. फ्रान्सने विश्‍वकरंडक जिंकला तर बोनसची रक्कम 30 हजार युरो इतकी असेल.

'लॉरेस स्पोर्टस'ने एम्बापेचे कौतुक केले आहे. "देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पैशाची गरज नसते अशी एम्बापेची विचारसरणी आहे. तो खराखुरा 'लिजंड' आहे,'' असे ट्‌विट या संस्थेने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kylian Mbappe Donating match fees to Charity