अर्जेंटिना अखेर पात्र; आता लढत फ्रान्सशी (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
Wednesday, 27 June 2018

ड गटात क्रोएशियाचा संघ 9 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर, अर्जेंटिनाही विजयामुळे 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यामुळे हे दोन्ही संघ अंतिम सोळासाठी पात्र ठरले. क गटात फ्रान्स आणि डेन्मार्क यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. यंदाच्या विश्वकरंडकात गोलशून्य बरोबरीत सुटलेला हा पहिला सामना ठरला. तर, दुसऱ्या सामन्यात पेरूने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. त्यामुळे या गटात फ्रान्स 7 गुणांसह पहिल्या आणि डेन्मार्क 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. आता उपउपांत्यफेरीत क्रोएशियाचा सामना डेन्मार्कशी होणार आहे. तर, अर्जेंटिना आणि फ्रान्स या बलाढ्य संघांमध्ये लढत पहायला मिळणार आहे. 

विश्वकरंडकात आपले आव्हान कायम ठेवण्यात अखेर अर्जेंटिनाला यश आले. लिओनेल मेस्सी या स्टार खेळाडूकडून गोल करण्याची अपेक्षा नायजेरियाविरुद्धच्या सामन्यात पूर्ण झाली. अर्जेंटिनाने नायजेरियाचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे.  

मार्कस रोजो याने शेवटच्या क्षणी मारलेल्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने नायजेरियाचा 2-1 असा पराभव केला. पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी या सामन्यात विजय मिळविणे अर्जेंटिनासाठी गरजेचे होते. सामन्याच्या सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास अर्जेंटिनाने सुरवात केली. 14 व्या मिनिटाला लिओनेल मेस्सी याने बनेगाच्या पासवर सुरेख गोल करून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे तीन विश्वकरंडकात गोल करणारा मेस्सी हा अर्जेंटिनाचा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी मेस्सी याने 2006 आणि 2014 च्या विश्वकरंडकात गोल केले होते. अर्जेंटिनासाठी तीन विश्वकरंडकात दिएगो मॅरोडोना (1982, 1986 आणि 1994), ग्रॅबीएल बॅटीश्कुटा (1994, 1998 आणि 2002) यांनी तीन गोल केले होते. पुढील फेरीत पात्र होण्यासाठी नायजेरियाला या सामन्यात बरोबरी करणे पुरेसे होते. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंकडून अर्जेंटिना आघाडीवर असतानाही बरोबरीसाठी प्रयत्न करण्यात येत होते. पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर असताना दुसऱ्या हाफमध्ये 51 व्या मिनिटाला नायजेरियाच्या व्हिक्टर मोझेस याने पेनल्टीवर गोल करून नायजेरियाला बरोबरी साधून दिली. मात्र, अखेरच्या काही मिनिटांमध्ये 86 व्या मिनिटाला मार्कस रोजो याने ग्रॅबीएल मर्काडो याच्या पासवर 12 यार्डवरून सुरेख व्हॉली मारून गोल नोंदवून अर्जेंटिनाला बाद फेरीसाठी पात्र ठरविले.

मंगळवारी याचवेळी झालेल्या दुसऱ्या सामन्यात क्रोएशियाच्या इव्हान पेरिसिच याने 90 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे क्रोएशियाने आइसलँडचा 2-1 असा पराभव केला. हा सामन्याच्या निकालावर या ग्रुपचे भवितव्य नव्हते. क्रोएशिया या गटात अव्वल राहणार हे स्पष्ट असल्याने या सामन्यात क्रोएशियाच्या प्रशिक्षकांनी मुख्य खेळाडूंना विश्रांती देत नऊ खेळाडू बदली केले. या सामन्यात पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये 53 मिनिटाला मिलान बाब्लेज याने हाफ व्हॉली मारत क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली. आइसलँडच्या जिफी सिगुर्सन याने 76 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत बरोबरी साधून दिली. पेनल्टीवर गोल होण्याची या विश्वकरंडकातील ही 17 वी वेळ होती. एका विश्वकरंडकात पेनल्टीद्वारे गोल होण्याची बरोबरी या गोलमुळे झाली. यापूर्वी 1998 मध्ये एका विश्वकरंडकात पेनल्टीवर 17 गोल झाले होते. सामन्याच्या भरपाई वेळेत 90 (+1) क्रोएशियाच्या इव्हान पेरिसिचने जोरदार शॉट मारून गोल करत क्रोएशियाला 2-1 ने विजय मिळवून दिला. या विजयासह क्रोएशियाने पहिल्यांदा विश्वकरंडकात सलग तीन सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे.

ड गटात क्रोएशियाचा संघ 9 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर, अर्जेंटिनाही विजयामुळे 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यामुळे हे दोन्ही संघ अंतिम सोळासाठी पात्र ठरले. क गटात फ्रान्स आणि डेन्मार्क यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. यंदाच्या विश्वकरंडकात गोलशून्य बरोबरीत सुटलेला हा पहिला सामना ठरला. तर, दुसऱ्या सामन्यात पेरूने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. त्यामुळे या गटात फ्रान्स 7 गुणांसह पहिल्या आणि डेन्मार्क 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. आता उपउपांत्यफेरीत क्रोएशियाचा सामना डेन्मार्कशी होणार आहे. तर, अर्जेंटिना आणि फ्रान्स या बलाढ्य संघांमध्ये लढत पहायला मिळणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Argentina and Croatia qualify to Round 16