बेल्जियम, इंग्लंड बाद फेरीत; जपानही नशिबवान (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
Friday, 29 June 2018

गुरुवारी विश्वकरंडकात एच गटात झालेल्या सामन्यांत कोलंबियाने सेनेगलचा 1-0 आणि पोलंडने जपानचा 1-0 असा पराभव केला. त्यामुळे कोलंबिया या गटात अव्वल स्थानावर राहिले. तर, जपान हा बाद फेरीत पात्र होणारा आशिया खंडातील एकमेव देश ठरला आहे. जपानने फेअर प्लेच्या आधारे बाद फेरी गाठली आहे. आता बाद फेरीत कोलंबियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. तर, बेल्जियमची लढत जपानविरुद्ध होणार आहे. 

विश्वकरंडकात गुरुवारी झालेल्या सामन्यांत बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला. मात्र, या दोन्ही संघांनी यापूर्वीच बाद फेरी गाठली होती. तर, तिकडे एच गटात जपानचा संघ नशिबवान ठरला, ते फेअर प्लेच्या आधारे बाद फेरीसाठी पात्र ठरले.

बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव करून जी गटात अव्वल स्थान मिळविले. बेल्जियम अणि इंग्लंड हे दोन्ही संघ बाद फेरीसाठी यापूर्वीच पात्र झाल्याने दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांनी संघात अनेक बदल केले. बेल्जियमच्या प्रशिक्षकांनी नऊ, तर इंग्लंडच्या संघात आठ बदल केले. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. बेल्जियमच्या यजुजाज याने 51 व्या मिनिटाला गोल करत बेल्जियमला विजय मिळवून दिला. या दोन बलाढ्य संघातील खेळ जोरदार होईल, अशी अपेक्षा होती, बेल्जियमचे अनेक खेळाडू इंग्लंडमध्ये क्लबमध्ये खेळतात. पण, दोन्ही संघांच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्याने हा सामना रंगतदार होऊ शकला नाही.

जी गटात त्याचवेळी पनामा आणि ट्युनिशिया यांच्यात सामना झाला. ट्युनिशियाने पिछाडीवरून पनामाचा 2-1 असा पराभव केला. दोऩ्ही संघ या सामन्यापूर्वी बाद फेरीसाठी अपात्र ठरले होते. 33 व्या मिनिटाला ट्युनिशियाच्या मरिया याने स्वयंगोल करत पनामाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये ट्युनिशियाने आक्रमक खेळ करण्यास सुरवात केली. 51 व्या मिनिटाला ट्युनिशियाच्या बेल युसुफ याने गोल करत बरोबरी करून दिली. त्यानंतर 66 व्या मिनिटाला खाझरी याने गोल करत ट्युनिशियाला निर्णायक विजय आघाडी मिळवून दिली. विश्वकरंडकाच्या इतिहासात ट्युनिशियाने 40 वर्षांनी विजय मिळविला आहे. यापूर्वी ट्युनिशियाने 1978च्या विश्वकरंडकात विजय मिळविला होता. त्यावेळी त्यांनी मेक्सिकोचा 3-1 असा पराभव केला होता. दुसरीकडे पनामाचा संघ पहिल्यांदा विश्वकरंडकात खेळत होता आणि त्यांना तिन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला.

गुरुवारी विश्वकरंडकात एच गटात झालेल्या सामन्यांत कोलंबियाने सेनेगलचा 1-0 आणि पोलंडने जपानचा 1-0 असा पराभव केला. त्यामुळे कोलंबिया या गटात अव्वल स्थानावर राहिले. तर, जपान हा बाद फेरीत पात्र होणारा आशिया खंडातील एकमेव देश ठरला आहे. जपानने फेअर प्लेच्या आधारे बाद फेरी गाठली आहे. आता बाद फेरीत कोलंबियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. तर, बेल्जियमची लढत जपानविरुद्ध होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Belgium England Japan qualify to Round 16