आता जर्मनीसाठी अस्तित्वाची लढाई

वृत्तसंस्था
Saturday, 23 June 2018

गतविश्‍वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दोन्ही संघांची रशियातील या स्पर्धेत धोकादायक सुरवात झाली. जर्मनीला सलामीच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे त्यांना आता तातडीने सावरावे लागणार आहे; तर क्रोएशियाविरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर अर्जेंटिना गटांगळ्या खात आहे. आता अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवला तरी त्यांचे भवितव्य इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. अर्जेंटिनासाठी पहिले दोन आणि प्रामुख्याने दुसरा सामना आव्हानात्मक असेल, असे मी अगोदरच सांगितले होते. युरोपियन संघांनी मानसिकता, प्रामुख्याने लिओ मेस्सीविरुद्धचे त्यांचे डावपेच अशी अनेक कारणे आहेत. अर्जेंटिनासाठी अजून काही तरी चांगले होऊ शकते, असे माझे अंतर्मन सांगते. स्टेडियममध्ये बसून स्वप्न भंग होताना पाहणे दुःखद असते. लढण्याची वृत्ती कमी होण्यासारखी अनेक कारणे आहेत. 2002च्या स्पर्धेत आम्ही गटसाखळीतच गारद झालो होतो; परंतु 0-3 सारखे मानहानिकारक पराभव झाले नव्हते.

फुटबॉल एका खेळाडूचा खेळ नाही
संघाचे मनोबल उंचावण्यात कमी पडल्याबद्दल मेस्सीकडे बोट दाखवले जाईल. त्याच्याकडून सदैव चांगलीच कामगिरी केली जाईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आइसलॅंडविरुद्ध पेनल्टी किक गमावल्यावर त्याच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली आहे. तसेच क्रोएशियाविरुद्धही तो प्रभाव पाडू शकला नाही. त्याने प्रयत्न केले; परंतु संधीच मिळाली नाही. फुटबॉल हा एका खेळाडूचा खेळ नाही. 1986 मध्ये अर्जेंटिनाला माझ्या नेतृवाखाली विजेतेपद मिळाले असले, तरी ते माझ्यामुळे मिळाले, असे मी म्हणणार नाही. मेस्सीला तर त्याला तुल्यबल सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही, त्यामुळे तो प्रभावशाली ठरला नाही, असे माझे मत आहे.
क्रोएशियाला विजयाचे श्रेय देत असताना आपला संघ काय करत होता, असा प्रश्‍न आपण उपस्थित करू शकतो. आपण ठोस अशी संघरचना का करू शकलो नाही. मधली फळी प्रतिस्पर्ध्यांची आक्रमणे का थोपवू शकत नव्हती. पेनल्टी क्षेत्रात चेंडू आल्यावर बचाव अस्थिर का वाटत होता. चेंडू बाहेर मारण्याची वेळ असताना गोलरक्षक कोणता विचार करत होता... अशा अनेक प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.

व्यापक विचार हवा
संघाची कामगिरी खराब होत असताना संघातील स्टार खेळाडूंवर टीका करणे सोपे असते. अर्जेंटिनाला आता व्यापक विचार करायला हवा. अखेरच्या साखळी सामन्यात मोठ्या विजयासाठी प्रयत्न करायला हवा. अपयश केवळ मेस्सीमुळे आलेले नाही, हे तर सर्वांचे अपयश आहे. मेस्सीवर टीका करून अपयशाला वेगळे वळण देण्यासारखे आहे. आता नायजेरियाविरुद्धच्या सामन्यासाठी एकत्रित खेळ करायला हवा.

जर्मनीसाठी करो वा मरो
जर्मनीसाठीही दुसरा साखळी सामना आव्हानात्मक असेल. दक्षिण कोरियाला पराभूत केल्यामुळे स्वीडनचा आत्मविश्‍वास वाढला असेल. ते गतविजेत्यांची परिस्थिती अडचणीची करू शकतात. मेक्‍सिको कोरियाला पराभूत करून सहा गुण आपल्या खात्यात जमा करू शकतात, त्यामुळे स्वीडनविरुद्धचा सामना जर्मनीसाठी करो अथवा मरो असाच आहे. फिलिप लाह्म आणि श्‍वाईस्टॅंगर यांच्या निवृत्तीमुळे जर्मनीचा बचाव कमकुवत वाटत आहे. गोलरक्षक आणि मधली फळी यातील अंतराचा मेक्‍सिकोने पुरेपूर फायदा घेतला होता.
स्वीडनचा बचाव अतिशय भक्कम आहे. मधली फळीही सक्षम आहे, 4-4-2 अशा व्यूहरचनेत ते खेळतात. त्यांच्या या बचावातून मेसूत ओझील आणि थॉमस मुल्लर यांना जागा शोधावी लागणार आहे. जर त्यांनी गोल केले तर स्वीडनला व्यूहरचनेत बदल करावा लागेल. महत्त्वाचा सामना असल्यामुळे अनुभवात जर्मनी पुढे आहे. अर्जेंटिनापेक्षा ते चांगली कामगिरी करतील, अशी माझी आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maradona writes about Germany