ओह नो, आता ते बोअरिंग पेनल्टी शूट आउट!

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे.

निझनी नोगगोरोड, ता. 29 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे. बाद फेरीचा पहिला सामना उरुग्वे आणि पोर्तुगालमध्ये होईल, तर अर्जेटिना आणि फ्रान्स या माजी विजेत्यांमध्ये दुसरी लढत होईल.
स्पेनमधील 1982 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पेनल्टी शूट आउटचा प्रथम वापर झाला. पेनल्टी शूट आउट सुरू झाल्यापासून त्याचे चाहते कमी असले तरी दुसरा योग्य पर्याय गवसत नसल्याची खंत आहे. 1982 पासून दोन अंतिम आणि पाच उपांत्य लढतीचा निर्णय एक प्रकारची लॉटरी असलेल्या पेनल्टी शूट आउटवर झाला.
स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात फेरलढतीचा पर्याय होता; पण त्यानंतर नाणेफेकीवर निकाल होण्यास सुरुवात झाली. 1978 च्या स्पर्धेपासून त्याची सुरुवात झाली; पण त्या स्पर्धेत याची गरज भासली नाही. आता याचा फेरआढावा घेताना या पेनल्टी शूट आउटच्या वेळी गोलरक्षकापेक्षाही जास्त दडपणास पेनल्टी किक घेणारा खेळाडू सामोरा जात असतो. त्यामुळे या किकवरील यशाचे प्रमाण कमी आहे, याकडे लक्ष वेधले जाते.

सलणारा पेनल्टी शूट आउट
- 1994 मध्ये रॉबर्टो बॅजिओची किक गोलपोस्टवरून, ब्राझील जगज्जेते
- 1990 मध्ये ख्रिस वॅडल यांची स्वैर पेनल्टीमुळे इंग्लंड, जर्मनी उपांत्य फेरीत 4-2 विजयी
- स्पर्धा इतिहासात पेनल्टी शूट आउटवर 26 लढतींचा निर्णय
- दोनदा लढतीचा निर्णय प्रत्येकी पाचपेक्षा जास्त पेनल्टी किक झाल्यानंतर
- कधीही पेनल्टी शूट आउट न गमावलेले जर्मनी स्पर्धेबाहेर
- यंदाच्या स्पर्धेतील चार संघांच्या यापूर्वी पेनल्टी शूट आउटवर लढती
- अर्जेंटिनाच्या सर्वाधिक पाच लढती पेनल्टी शूट आउटवर, त्यात चार विजय
- ब्राझीलचा चारपैकी तीनमध्ये, तर फ्रान्सचा चारपैकी दोनमध्ये
- इंग्लंड (3), मेक्‍सिको (2) आणि स्वित्झर्लंड (1) यांनी एकही पेनल्टी शूट आउट जिंकलेला नाही
- 2006 च्या स्पर्धेत युक्रेनविरुद्ध स्वित्झर्लंडचा पेनल्टी शूट आउटमध्ये एकही गोल नाही
- पेनल्टी शूट आउटमध्ये 240 प्रयत्नात केवळ 170 गोल
- पेनल्टी शूट आउटपूर्वी नाणेफेकीवर निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Penalty Shoot out football worldcup