बेल वि. रोनाल्डो

वृत्तसंस्था
Wednesday, 6 July 2016

लेयॉन (फ्रान्स) - युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत उद्या (गुरुवारी) होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात पोर्तुगाल-वेल्स आमनेसामने येणार आहेत. सामना दोन देशांमधला असला, तरी व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत एकाच संघातून खेळणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डो विरुद्ध गॅरेथ बेल यांच्यातील सामन्याकडे संपूर्ण फुटबॉल विश्‍वाचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होईल.

युरोपियन स्पर्धेसाठी प्रथमच पात्र ठरलेल्या वेल्सने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून सुखद धक्का दिला आहे. उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य बेल्जियमवर मिळवलेला ३-१ हा विजय धक्कादायकच होता. व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत सर्वांत महागडे खेळाडू म्हणून ओळख असलेले रोनाल्डो आणि बेल रेआल माद्रिदकडून खेळत आहेत, परंतु उद्या ते प्रथमच देशासाठी खेळताना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. एकमेकांविरुद्ध त्यांची कामगिरी कशी होती, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

हा सामना दोन खेळाडूंमधला नाही, तर दोन देशांमधला आहे, असे सांगून बेलने ‘ऑलस्टार’ लढतीसाठी असलेले दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला. रोनाल्डो हा सर्वोत्तम खेळाडू आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, पण आम्ही केवळ एक खेळाडू नाही, संघ म्हणून काय करू शकतो, याचा विचार करत आहोत, असे बेलने सांगितले.

या युरो स्पर्धेत मात्र सर्व साखळी सामन्यांत बेलने गोल करून आपली क्षमता दाखवली आहे. तुलनेत रोनाल्डोला पहिल्या दोन साखळी सामन्यांत एकही गोल करता आला नव्हता आणि पेनल्टी किकही गमावली होती, परंतु हंगेरीविरुद्ध दोन गोल करून तो चार युरोपियन स्पर्धेत गोल करणारा पहिला खेळाडू ठरला होता.

पोर्तुगालविषयी बोलताना बेल म्हणतो, ‘‘त्यांनी या स्पर्धेत कशी वाटचाल केली आहे, याची माहिती आम्हाला आहे. त्यांचे सर्व सामने आम्ही टीव्हीवर पाहले आहेत. फुटबॉल क्रमवारीत त्यांचा क्रमांक वरचा आहे आणि तेवढेच ते धोकादायकही आहेत. गटामध्ये त्यांना विजय मिळवता आला नसला, तरी पुढील वाटचालीसाठी आवश्‍यक असलेली कामगिरी त्यांनी केली आहे.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ronaldo vs gareth bale