ब्रेवस्टरची दुसरी हॅटट्रिक; इंग्लंडचा ब्राझीलला धक्का

पीटीआय
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

कोलकता - सलग दुसऱ्या सामन्यात रियान ब्रेवस्टरने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर इंग्लंडने बलाढ्य आणि माजी विजेत्या ब्राझीलचा ३-१ असा पराभव करून १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारली.

कोलकता - सलग दुसऱ्या सामन्यात रियान ब्रेवस्टरने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर इंग्लंडने बलाढ्य आणि माजी विजेत्या ब्राझीलचा ३-१ असा पराभव करून १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारली.

मुसळधार पावसामुळे मैदान निसरडे झालेले असल्यामुळे विशाखापठ्ठणम येथील उपांत्य फेरीचा हा सामना कोलकतामध्ये हलवण्यात आला होता. विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियममध्ये ६३,८८१ प्रेक्षकांनी खच्चुन गर्दी केली होती. यातील बहुतेकांचा पाठींबा ब्राझीलला होता, परंतु इंग्लंडच्या ब्रेवस्टने जबरदस्त कामगिरी करून सर्वांची मने जिंकली. आता शनिवारी ते विजेतेपदासाठी याच मैदानात उतरतील.

थ्री लायन्स म्हणून संबोधले जाणाऱ्या इंग्लंडने दोनदा आघाडी घेतली. १० व्या मिनिटाला ब्रेवस्टरने शानदार गोल करून पहिला गोल केला त्यानंतर वेस्लीने ब्राझीलला बरोबरी साधून दिली तेव्हा सामना रंगतदार होण्याची चिन्हे दिसत होती. ३९ व्या मिनिटाला ब्रेवस्टरने दुसरा गोल केला.  मध्यांतरला इंग्लंड २-१ असे आघाडीवर होते तेव्हा  शंकेची पाल चुकचुकू लागली होती. पण त्याचवेळी ब्राझीलकडून प्रतिकाराचीही अपेक्षा केली जात होती. सामना पूर्णत्वाकडे जसा जसा झुकत होता तस तसे ब्राझीलवरचे दडपण वाढत होते त्यातच ७७ व्या मिनिटाला ब्रेवस्टरने आणखी एक गोल केला आणि ब्राझीलचा पराभवही निश्‍चित केला.

Web Title: sports news football england