आय-लीग सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘स्टार’वरून

पीटीआय
Sunday, 9 July 2017

नवी दिल्ली - देशांतर्गत होणाऱ्या फुटबॉलच्या मोसमातील आय-लीग सामन्यांचेही थेट प्रसारण आता ‘स्टार स्पोर्टस’ वाहिनीवरून करण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली - देशांतर्गत होणाऱ्या फुटबॉलच्या मोसमातील आय-लीग सामन्यांचेही थेट प्रसारण आता ‘स्टार स्पोर्टस’ वाहिनीवरून करण्यात येणार आहे. 

भारतीय फुटबॉल महासंघाच्या मुख्यालयात सुब्रता दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या मोसमापासून भारतात आय-लीग आणि आयएसएल या दोन्ही लीगला मान्यता देण्यात आली असून, त्या एकाच वेळी खेळविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. या दोन्ही लीग आता या वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनंतर होणार आहेत. या निर्णयानंतर आय-लीग क्‍लब संघांनी आमचेही सामने स्टार स्पोर्टसवरून दाखविण्याची मागणी केली होती.

 या बैठकीत ती मान्य करण्यात आली. त्यामुळे या वर्षी आयएसएल आणि आय-लीग या दोन्ही लीगचे स्टारवरून थेट प्रसारण करण्यात येईल. ‘स्टार’च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आता या दोन्ही लीगचा कार्यक्रम आखला जाणार आहे.

त्याचवेळी बैठकीमध्ये आय-लीग क्‍लबना मिळणारा निधीदेखील निश्‍चित करण्यात आला. यामध्ये प्रत्येक क्‍लबला प्रवासासाठी ५० लाख, विशेष निधी म्हणून २० लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर आय-लीगच्या मार्केटिंगसाठी भारतीय फुटबॉल महासंघ १ कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, त्या पूर्वी सर्व क्‍लबनी आपण किती खर्च करणार आहोत, याची माहिती महासंघाला कळवायची आहे.

परदेशी खेळाडूंचा मुद्दा अनुत्तरित
आय-लीग क्‍लब संघांनी अधिक परदेशी खेळाडूंना खेळविण्याचीदेखील विनंती केली होती. मात्र, या बाबतचा निर्णय अनुत्तरीतच राहिला. हा निर्णय भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रशासकीय समितीने सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांनाच निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार देण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news I-league match football