सामना गमावला; पण मने पुन्हा जिंकली

नवी दिल्ली - १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाविरुद्ध गोल नोंदविल्यानंतर जल्लोष करताना भारताचा जेक्‍सन थौनाओजाम (जर्सी नंबर १५) आणि इतर खेळाडू.
नवी दिल्ली - १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाविरुद्ध गोल नोंदविल्यानंतर जल्लोष करताना भारताचा जेक्‍सन थौनाओजाम (जर्सी नंबर १५) आणि इतर खेळाडू.

नवी दिल्ली - यजमान म्हणून पदार्पण केलेल्या भारतीय संघाने १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत दुसरा सामनाही गमावला; पण या वेळीही मने जिंकणारा खेळ केला. कोलंबियाकडून भारताचा १-२ असा पराभव झाला. जुआन पेनॅलोझा याने ४९व्या मिनिटाला कोलंबियाचे खाते उघडले. त्यानंतर ८२व्या मिनिटाला जेक्‍सन थौनाओजाम याने भारताला बरोबरी साधून दिली होती, पण पुढच्याच मिनिटाला पेनॅलोझा याने गोल केला. हा गोल निर्णायक ठरला.

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया संघाने हा सामना जिंकला असला तरी भारतासाठी सुद्धा ऐतिहासिक नोंद झाली. जेक्‍सन हा फिफा अंतिम किंवा मुख्य स्पर्धेत गोल करणारा भारताचा पहिलावहिला फुटबॉलपटू ठरला.

पूर्वार्धात भारतीयांनी जोरदार झुंज दिली. भारताने काही चाली रचून प्रयत्न सुद्धा केले. अभिजित सरकार याने जवळून मारलेला फटका कोलंबियाचा गोलरक्षक केव्हीन मिएर याने अडविला. पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत राहुल कन्नोली याने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागला.

भारताचा गोलरक्षक धीरज मोईरंगथेम याने प्रभावी खेळ कायम ठेवला. त्याने अनेक फटके अडविले. पूर्वार्ध गोलशन्यू बरोबरीत सोडवून भारताने आशा उंचावल्या होत्या, पण पेनॅलोझा याने उत्तरार्धात चौथ्याच मिनिटाला चित्र बदलले. डाव्या बाजूने पास मिळताच त्याने यशस्वी घोडदौड केली.

भारताचा गोल कॉर्नरवर झाला. मार्कर नसल्याचा फायदा उठवीत जेक्‍सन याने अचूक हेडिंग केले. हा गोल होताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला, पण तो थांबण्याआधीच कोलंबियाने लक्ष्य साधले. गुस्तावो कार्वाजाय याच्याकडून पास मिळताच पेनॅलोझाने छातीवर चेंडूचे संतुलन साधत गोल केला. भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. अखेरच्या  लढतीत घानाविरुद्ध मोठा विजय मिळविला तरच भारताला आशा असतील.

अमेरिकेचा दुसरा विजय
अमेरिकेने ‘अ’ गटातील ‘अ’ दर्जाचा खेळ कायम राखत घानावर मात केली. अमेरिकेचा हा सलग दुसरा विजय आहे. याबरोबरच अमेरिकेने गटातील आघाडी नक्की केली. उत्तरार्धात बदली खेळाडू अयो अकिनोला याने केलेला गोल निर्णायक ठरला. पूर्वार्धात पारडे समान होते. 

अमेरिकेच्या ब्लैन फेरी याने दोन वेळा सुरेख प्रयत्न केला. दुसऱ्या सत्रात घानाने खेळ उंचावत चांगल्या संधी निर्माण केल्या. यात सादिक इब्राहिम आणि इमॅन्यूएल टोकू यांचा पुढाकार होता. अमेरिकेने अंतिम टप्प्यात खेळाचा वेग वाढविला. अकिनोला याने ७५व्या मिनिटाला घानाचा गोलरक्षक डॅनाल्ड इब्राहिम याला चकविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com