विश्वकरंडकातील हिरो अन्‌ झिरो

Worldcup-Football
Worldcup-Football

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी! हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर सुरू होईल. मागे पडेल ती यंदाच्या विश्‍वकरंडकाने दिलेल्या हॅरी केन, एम्बापे, मॅंडझुकिच, लुकाकू, हिडन हेझार्ड, लुका मॉड्रिच अशा नव्या स्टार्सची. अलीकडच्या काळात फुटबॉल विश्‍व मेस्सी- रोनाल्डो- नेमार यांच्याच भोवती फुटबॉलप्रमाणे फिरत असते. गतवर्षी जर्मनीने अर्जेंटिनाचा पराभव करून विश्‍वविजेतेपद मिळवले.

अंतिम सामन्यात एकमेव आणि निर्णायक गोल करणाऱ्या मारिओ गोएत्झ या खेळाडूचे नाव कोणाला आठवतेय? एवढेच कशाला, तो यंदा जर्मनी संघातही स्थान मिळवू शकला नाही, ना कोणत्या लीगमध्ये चमकू शकला. 

विश्‍वकरंडक स्पर्धा दर चार वर्षांनी येते आणि अनपेक्षित खेळाडू देशाचे हिरो होतात; पण वर्षभर चर्चेत राहणारे सुपरस्टार मात्र अपेक्षाभंग करतात. रोनाल्डो सध्या ३४ वर्षांचा आहे, तर मेस्सी तिशीत पोचला आहे. हे दोघे पुढील विश्‍वकरंडक खेळतील की नाही, याचे उत्तर नाहीच असू शकेल.

थोडक्‍यात काय, विक्रमांचे विक्रम आणि लीग व चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देणारे हे खेळाडू देशाला मात्र विश्‍वविजेते करू शकले नाहीत. (नेमारच्या हातून दोन स्पर्धा गेल्या आहेत. अजूनही तरुण असल्यामुळे त्याच्यासाठी हिरो होण्याची संधी असेल, असे म्हणायला वाव आहे.)

...चर्चा रोनाल्डोच्या ‘ट्रान्सफर’ची
विश्‍वकरंडक स्पर्धा निर्णायक टप्पा सुरू झालेला असताना एम्बापे, लुकाकू चमकत होते; पण ‘भाव’ खात होता तो रोनाल्डो. युव्हेंटसने त्याच्यासाठी मोजलेले तब्बल ९ अब्ज रुपये हे क्‍लब आणि देशाचे फुटबॉल यामधील तफावत दर्शवण्यास पुरेसे आहे.

म्हणून पेले, मॅराडोना श्रेष्ठ!
गेल्या काही वर्षांत क्‍लब लीगची चर्चा अधिक आणि प्रसिद्धीही सर्वाधिक होत असते. अर्थात, सोशल मीडियाचा यात मोठा वाटा आहे. पेलेंच्या काळात व्यावसायिक लीगचे पेव नव्हते; पण क्‍लब फुटबॉल होते. मॅराडोना यांच्या काळात व्यावसायिक लीग होत्या; पण या आणि त्यांच्याप्रमाणे महान असलेल्या खेळाडूंचे प्राधान्य देशाला होते. म्हणूनच ते ब्राझील असो वा अर्जेंटिना, यांना विश्‍वविजेतेपद मिळवून देऊ शकले. या दोन सुपरस्टार खेळाडूंपेक्षा ग्लॅमरस म्हणून अधिक प्रसिद्धी डेव्हिड बॅकहॅमला मिळाली होती.

चेंडूवरील त्याचे कौशल्य लाजवाब होते, फ्री किकवरची हुकूमतही अफलातून होती; पण तो इंग्लंडला विजेतपद मिळवून देण्यात अपयशी ठरला. फार दूरची उदाहरणे कशाला, रोनाल्डो, रिव्हाल्डो, रॉबर्टो कार्लोस, रोनाल्डिन्हो हे ब्राझीलचे दिग्गज त्यांनी देशाला मिळवून दिलेल्या कामगिरीमुळे अधिक लक्षात आहेत.

सुपरस्टार ते सुपर फ्लॉप
 अपेक्षांचे ओझे. 
 लीगमध्ये अधिक साखळी सामने असल्यामुळे सुधारणा करायला संधी.
 विश्‍वकरंडकामध्ये मोजकेच सामने, त्यामुळे ‘आर या पार’.
 क्‍लब फुटबॉलमध्ये इतरही मोठे खेळाडू असल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांची रणनीती एकावर केंद्रित नसते.
 विश्‍वकरंडकामध्ये चारही बाजूने कोंडी केली जाते.
 किमान दहा महिने क्‍लबमधून खेळल्यामुळे सहकाऱ्यांबरोबर सामंजस्य तयार झालेले असते.
 देशाकडून वर्षभरात मोजकेच सामने असल्यामुळे सुपरस्टार्सना एकत्रित लय तयार करणे कठीण जाते.
 श्रेष्ठत्व दाखवण्याची अहमहमिका.

व्यावसायिक लीगचे हिरो (कंसात क्‍लब आणि देश)
ख्रिस्तियानो रोनाल्डो (रेयाल आता युव्हेंटस; पोर्तुगाल)
लिओनेल मेस्सी (ब्रार्सिलोना; अर्जेंटिना)
महम्मद सलाह (लिव्हरपूल; इजिप्त)
नेमार (पीएसजी; ब्राझील)
सुआरेझ (बार्सिलोना; उरुग्वे)

हिरो
एडन हजार्ड (बेल्जियम) 

यंदाच्या स्पर्धेत पूर्ण भरात खेळलेला हा खेळाडू. एकाग्रता आणि कमालीच्या ताकदीने त्याने केवळ आपलाच प्रभाव पाडला नाही, तर त्याने बेल्जियमला यशस्वी नेतृत्वही दिले. बाद फेरीच्या लढतीत त्याची कामगिरी खूप महत्त्वाची ठरली. लुकाकूसारखा आक्रमक खेळाडू संघात असताना त्याने एक कर्णधार आणि मध्यरक्षक म्हणून बजावलेली भूमिका त्याच्यातील गुणवत्ता सिद्ध करणारी ठरली. 

लुका मॉड्रिच (क्रोएशिया) 
एक जबरदस्त मध्यरक्षक. क्रोएशियाची संपूर्ण स्पर्धेतील ताकद म्हणून त्याच्याकडे पाहिले गेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. प्रचंड संयम आणि आत्मविश्‍वास असणाऱ्या या खेळाडूची कामगिरी क्रोएशियाच्या विजयात नक्कीच निर्णायक ठरली. 

इवान पेरिसीच (क्रोएशिया) 
सामान्यपणे विंगर म्हणून खेळणारा हा खेळाडू. पण विश्‍वकरंडक स्पर्धेच्या माध्यमातून एक आक्रमक मध्यरक्षक आणि पर्यायी स्ट्रायकर म्हणून त्याची ओळख झाली. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या विजयात त्याचीच कामगिरी निर्णायक ठरली. 

मारिओ मॅंडझुकीच (क्रोएशिया)  
विश्‍वासू, आक्रमक खेळाडू व वेगवान मैदानी खेळ हे त्याचे वैशिष्ट्य. आक्रमणाबरोबरच त्याचे बचावात संघाला मिळणारे योगदान त्याच्यातील अष्टपैलूत्व दाखवून देते. नियोजित नव्वदच काय, पण अतिरिक्त वेळेतही त्याच्यातील ऊर्जा कायम असते.

किलिअन एम्बाप्पे (फ्रान्स) 
फ्रान्सचा नवोदित आक्रमक. सर्वांत तरुण. २० वर्षीय एम्बाप्पेच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा असणारा कमालीचा वेगवान खेळ. अन्य कुठल्याही स्पर्धकापेक्षा तो अधिक वेगवान धावतो. त्याच्या वेगाशी स्पर्धा करणे कोणालाच झेपले नाही. अर्जेंटिनाविरुद्धच्या विजयात त्याचा निर्णायक वाटा.

रोमेलू लुकाकू (बेल्जियम) 
इंग्लिश प्रीयिमर लीगमधील आपला क्‍लब असो वा बेल्जियम संघ, लुकाकू स्ट्रायकर म्हणूनच खेळतो. वयाच्या २३ व्या वर्षी प्रीमियर लीगमध्ये गोलांचे अर्धशतक करणाऱ्या पाच खेळाडूंपैकी हा एक. बेल्जियमसाठी ४० गोल करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याचा वेग इतका अफाट आहे की, कधी कधी त्याच्या वेगाशी जुळवून घेताना सहकाऱ्यांची धांदल उडते. यंदाच्या स्पर्धेतही हे दिसून आले. 

हॅरी केन (इंग्लंड) 
इंग्लंडचा प्रमुख खेळाडू. प्रीमियर लीगमधून उदयास आला. स्ट्रायकर म्हणूनच त्याची ओळख. प्रीमियर लीगचा २०१४-१५ चा मोसम खेळताना ३१ गोल करून आपला दबदबा निर्माण केला. प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत त्याचा सहावा क्रमांक लागतो. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत त्याने सहा गोल नोंदविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com