भारताकडून पाकचा 4-0 धुव्वा 

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

काल कबड्डीत आणि हॉकीत भारताने पाकिस्तानवरचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. आजपासून सुरू झालेल्या चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने सलामीलाच पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवला. रमणदीप सिंग, दिलप्रीत सिंग, मनदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी गोल धडाका लावला. 
 

ब्रेडा (हॉलंड) - काल कबड्डीत आणि हॉकीत भारताने पाकिस्तानवरचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. आजपासून सुरू झालेल्या चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने सलामीलाच पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवला. रमणदीप सिंग, दिलप्रीत सिंग, मनदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी गोल धडाका लावला. 

पाकविरुद्ध पूर्ण वर्चस्व मिळवणाऱ्या भारताचा नियोजनबद्ध खेळही प्रभावशाली ठरला. पाकिस्तानला कोठेही डोकेवर काढू न देण्याची रणनीती प्रशिक्षक हरेंदर सिंग यांनी आखली होती आणि खेळाडूंनी त्याची अंमलबजावणीही केली. पूर्वार्धापर्यंत 1-0 आघाडी आणि अंतिम कॉर्टरमध्ये तीन गोल वर्चस्वाची साक्ष देणारे होते. 

या क्वॉर्टरमध्ये तर भारतीयांनी पाकचा बचावच नव्हे, तर गोलरक्षकालाही सैरभैर केले होते. अखेरचा गोल झाला त्या वेळी पाकच्या गोलरक्षकाने गोलपोस्ट सोडला होता. त्यामुळे मनदीपला रिकाम्या गोलजाळ्यात चेंडू मारणे सोपे झाले. भारताच्या आक्रमणापुढे हतबल झालेल्या पाकने 55 व्या मिनिटाला गोलरक्षकालाही आक्रमणावर लावले; परंतु ही चाल त्यांच्याच अंगलट आली. मनदीपच्या स्टीकमध्ये चेंडू येताच तो सुसाट निघाला आणि गोल केला. काही वेळात ललितने चौथा गोल केला. या वेळी पाकने रिव्ह्यूचीही मदत घेतली; परंतु गोल वैध ठरला. 

त्याअगोदर सावध पण ठोस सुरवात करणाऱ्या भारताच्या खात्यात 25 व्या मिनिटाला पहिल्या गोलाची नोंद झाली. सीमरंजनजीतच्या पासवर रमणदीपने गोल केला. तिसरा क्वार्टर सुरू होईपर्यंत भारताने ही निसटती आघाडी कायम ठेवली होती. हा सामना भारताचे माजी प्रशिक्षक परंतु आता पाकिस्तानचे प्रशिक्षक असलेल्या रोलॅंट ऑल्टमन्सविरुद्ध हरेंदर सिंग यांच्या डावपेचांचीही कसोटी पाहणारा होता. या अगोदर झालेल्या एका आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑल्टमन्स यांची हुशारी पिछाडीवर पाकिस्तानचा पराभव टाळणारी ठरली होती. आज मात्र भारतीयांनी अंतिम टप्प्यात पाकला प्रतिकार करण्याची संधीच दिली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India defeats Pak 4-0