गतविजेत्या भारतासमोर आज जपानचे आव्हान

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

जपानचा संघ दर्जेदार आहे. त्यांनी आम्हाला नेहमीच कडवी झुंज दिली आहे. सुरवातीलाच त्यांचा बचाव भेदणे महत्त्वाचे असेल. 
- सुनीता लाक्रा, भारतीय कर्णधार 

 

डॉंगहाई सिटी (दक्षिण कोरिया) - गतविजेत्या भारतासमोर पाचव्या आशियाई चॅंपियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेत रविवारी सलामीच्या लढतीत जपानच्या बलाढ्य संघाचे आव्हान असेल. 

अनुभवी बचावपटू सुनीता लाक्रा हिच्या नेतृत्वाखाली भारताने अनुभवी संघ पाठविला आहे. सविता उपकर्णधार आहे. जागतिक क्रमवारीत जपान 12 वा, तर भारत दहावा आहे. अर्थात जपानने संघटित बचावाच्या जोरावर भारताला नेहमीच कडवी झुंज दिली आहे. 2013 च्या स्पर्धेत जपानने भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते. 2016 च्या सिंगापूरमधील स्पर्धेत भारताने अखेर प्रथमच विजेतेपद मिळविले, पण तेव्हासुद्धा जपानने 2-2 अशी बरोबरी साधली होती. त्याशिवाय जपानने अंतिम फेरी गाठलेल्या चीनला साखळीत हरविले होते. 

गेल्या वर्षी जुलै महिन्यात वर्ल्ड हॉकी लीगच्या तिसऱ्या फेरीतही भारताला 0-2 असे पराभूत व्हावे लागले होते. भारताने आशिया करंडक स्पर्धेत मात्र जपानला यशस्वी शह दिला होता. 

भारताने शुक्रवारी सराव सामन्यात मलेशियाचा 6-0 असा धुव्वा उडविला. त्यामुळे संघाचा आत्मविश्‍वास उंचावल्याचे सुनीताने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japan's challenge today champions India