अझलन शाह स्पर्धा युवकांसाठी सुवर्ण संधी - मनप्रीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

बंगळूर - आगामी अझलन शाह हॉकी स्पर्धेतून युवा खेळाडूंना आपली क्षमता दाखवून देण्याची सुवर्ण संधी मिळेल, अशी प्रतिक्रिया भारताचा मध्यरक्षक मनप्रीत सिंग याने मंगळवारी व्यक्त केली.

बंगळूर - आगामी अझलन शाह हॉकी स्पर्धेतून युवा खेळाडूंना आपली क्षमता दाखवून देण्याची सुवर्ण संधी मिळेल, अशी प्रतिक्रिया भारताचा मध्यरक्षक मनप्रीत सिंग याने मंगळवारी व्यक्त केली.

लंडनमध्ये जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या तयारीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असेल. त्यामुळे आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी युवा खेळाडूंना मिळणार आहे. अझलन शाह स्पर्धेसाठी पुढील आठवड्यात भारतीय संघ निवडला जाईल. भारत नव्या मोसमात ही पहिलीच स्पर्धा खेळणार आहे. मनप्रीत म्हणाला, 'यंदाच्या मोसमातील ही आपली पहिलीच स्पर्धा असल्यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही कुठे आहोत आणि काय सुधारणा करायला हवी याचा अंदाज येईल. या स्पर्धेनंतर आम्हाला हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरी खेळायची आहे. त्यामुळेच महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी आम्हाला या स्पर्धेतून चांगला सराव मिळेल.''

अझलन शाह स्पर्धेत गतविजेत्या ऑस्ट्रेलियासह इंग्लंड, न्यूझीलंड, मलेशिया, जपान आणि कोरिया हे संघ खेळणार आहेत. गेल्या वर्षी भारताला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे या वेळी विजेतेपद मिळविण्याच्या उद्देशानेच आम्ही उतरू, असे मनप्रीतने सांगितले.

मनप्रित म्हणाला, 'गेल्या वर्षी आम्ही अंतिम लढतीत हरलो होतो. या वेळी विजेतेपद मिळविण्याच्याच उद्देशाने आम्ही उतरू. सराव सत्रात खेळाडू चांगली मेहनत घेत आहेत. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय साधण्यात आला आहे. नियोजन पक्के असून, आम्ही ते मैदानात किती यशस्वीपणे राबवतो यावर आमचे यश अवलंबून असेल.''

मनदीप, हरजीत आणि हरमनप्रीत हे युवा खेळाडू यापूर्वी अझलन शाह स्पर्धेत खेळले आहेत. आणखी काही नवोदित खेळाडू संघाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. मनप्रीत म्हणाला, 'निश्‍चितच, आता विविध जागांसाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने संघातील कुणाचेच स्थान निश्‍चित नाही. युवा खेळाडूंना संधी मिळाल्यावर त्यांना गुणवत्ता दाखवण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्यासाठी काय आवश्‍यक आहे या गोष्टी शिकता येतील. स्पर्धा जुनीच असली, तरी मोसम नवा असल्यामुळे आम्ही सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील आहोत.''

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात प्रामुख्याने युवा खेळाडूंचा समावेश असेल. भारताचा अंतिम संघ निश्‍चित व्हायचा आहे; पण युवा खेळाडूंना प्राधान्य मिळेल असाच मतप्रवाह आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य संघांचे आव्हान पेलणाराच संघ निवडला जाईल.
- मनप्रीत सिंग

Web Title: manprit sing talking