हॉकीपटूंना आता मिळणार 50 हजारांचा भत्ता

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जुलै 2018

2020 आणि 2024 रोजी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' योजनेअंतर्गत खेळाडूंना तयारीसाठी लागणारी आर्थिक मदत पुरविली जाणार आहे.

मुंबई : केंद्रीय क्रिडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हॉकीपटूंना 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' (टॉप्स) योजनेअंतर्गत मासिक 50 हजार रुपयांचा भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2020 आणि 2024 रोजी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम' योजनेअंतर्गत खेळाडूंना तयारीसाठी लागणारी आर्थिक मदत पुरविली जाणार आहे. आशियाई स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघातील 18 खेळाडूंपैकी प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता देण्यात येणार आहे. मंत्रालयाने मागील वर्षीपासून या योजनेअंतर्गत भत्ता देण्यास सुरुवात केली असली तरी हॉकीपटूंना प्रथमच या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

 
नव्याने नियुक्ती करण्यात आलेले मार्गदर्शक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतूय हॉकी संघाने नुकतेच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रौप्य पजक पटकावले होते, संघाच्या याच कामगिरीमुळे त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेत महिला हॉकी संघाचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही. आशियाई आणि विश्वकरंडक स्पर्धेतील कामगिरीनंतर त्यांच्या समावेशाबद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

याशिवाय जिम्नॅस्टिक, टेनिस, नेमबाजी, कुस्ती, ज्युदो, बॉस्किंग आणि वुशू या सर्व क्रीडा प्रकारांनाही मासिक भत्ता देण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा संघटनेने ट्विट करुन सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men’s Hockey team included under TOPS