नव्या संघरचनेसाठी नवोदितांनाही संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबई - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा 29 एप्रिलपासून मलेशियातील इपोह येथे सुरू होत आहे.

मुंबई - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ही स्पर्धा 29 एप्रिलपासून मलेशियातील इपोह येथे सुरू होत आहे.

कर्णधारपदी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला कायम ठेवण्यात आले आहे.
लखनौ येथे झालेल्या ज्युनिअर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या, तसेच इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून लक्ष वेधणाऱ्या चार खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. गुरिंदरसिंग, सुमित व मनप्रीत हे ज्युनिअर विश्‍वकरंडक विजेत्या संघातील खेळाडू आहेत, तर सूरज करकेरा हा 21 वर्षीय मुंबईचा गोलरक्षक आहे. सूरज हा 2016 मध्ये इंग्लड दौरा करणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. तसेच गतवर्षी रशियात झालेल्या युरो-आशिया करंडक चौरंगी हॉकी स्पर्धेतही तो खेळला होता.

भारतीय प्रशिक्षक रोलॅंट ऑल्टमस यांनी भविष्याच्या दृष्टीने संघ उभारण्याची तयारी सुरू केली आहे. 2018 मध्ये होणारी जागतिक स्पर्धा आणि 2020 मधील टोकियो ऑलिंपिक स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून आपण विचार करणार असल्याचे ऑल्टमस यांनी सीनियर्स खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरात संभाव्य खेळाडूंना सांगितले होते.

या संघात ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग, ज्युनियर विश्‍वकरंडक विजेता कर्णधार हरजित सिंग व आक्रमक मनदीपसिंग या त्रयीचा समावेश आहे. या तिघांनी भारताच्या विश्‍वविजेतेपदामध्ये निर्णायक कामगिरी बजावली होती. याच अझलन शाह स्पर्धेत गतवर्षी ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे रौप्यपदक विजेत्या संघात या तीन खेळाडूंचा समावेश होता.

यंदाच्या वर्षात होणाऱ्या जागतिक लीग उपांत्य साखळी, आशिया करंडक व भुवनेश्‍वर येथे होणारी हॉकी लीग स्पर्धा अशा तीन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी योग्य संघरचना तयार करण्याकरिता या अझलन शाह स्पर्धेचा उपयोग करून घेण्याचा ऑल्टमस यांचा विचार आहे.

नव्या संघातील प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तरीही देशासाठी सर्वाधिक यश मिळवणे हे प्रत्येकाचे ध्येय असेल. नवी संघरचना असल्यामुळे निकालामध्ये चढ-उतार होऊ शकतात; परंतु विजयासाठीच आम्ही मैदानात उतरू, असे ऑल्टमस यांनी सांगितले.
संघ - गोलरक्षक - श्रीजेश (कर्णधार), सूरज करकेरा.
बचावपटू - प्रदीप मोर, सुरेंद्र कुमार, रूपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग, गुरिंदर सिंग.
संरक्षक - चिंग्लेनसाना सिंग कांगुजाम, सुमित सरदार सिंग, मनप्रीत सिंग (उपकर्णधार), हरजित सिंग, मनप्रीत सिंग.
आक्रमक - एस. व्ही. सुनील, तलविंदर सिंग, मनप्रीत सिंग, अफान युसुफ, अक्षरदीप सिंग.

अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचे मिश्रण आम्ही जाणीवपूर्वक करत आहोत. काही नवोदित खेळाडू याअगोदरही सीनियर संघातून खेळलेले आहेत. नवी संघरचना तयार करण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन व न्यूझीलंडसारख्या संघांच्या तुलनेत आमची नवी संघरचना कशी असेल, हे तपासायचे आहे.
- रोलॅंट ऑल्टमन्स, भारतीय प्रशिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new playcer chance in new team structure