‘आशियाई करंडक विजेतेपद ही सुरवात’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

महिला हॉकीमध्येही खूप काही करण्यासारखे आहे. भारतीय महिला संघासाठीदेखील मी खूप काही योगदान देऊ शकतो.
- हरेंद्रसिंग

नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाने तब्बल तेरा वर्षांनी आशियाई करंडक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. महिला संघाचे प्रशिक्षकपद प्रथमच सांभाळताना हरेंद्रसिंग यांनी ही किमया घडवून आणली असली, तरी त्यांनी हे विजेतेपद म्हणजे केवळ सुरवात आहे, अजून खूप करायचे बाकी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

हरेंद्रसिंग म्हणाले,‘‘महिला संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर ही सुरवात आहे. आशियाई करंडक विजेतेपद त्याचा पाया असून, आता त्याच्यावर यशाची इमारत उभी करायचे आव्हान आहे. पुढील वर्षी राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्‍व करंडक अशा मोठ्या स्पर्धा आमच्यासमोर असून, यातून किमान दोन पदके आम्ही अपेक्षित करत आहोत.’’

महिला हॉकी केवळ बघणाऱ्या हरेंद्रसिंग यांना महिला संघाला मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतीय कुमारांना जगज्जेते बनवल्यानंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात महिलांना आशियाई करंडकाचे विजेतेपद मिळवून दिले. क्रीडा जगतात काही अशक्‍य नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. हरेंद्रसिंग म्हणाले, ‘‘महिलांच्या वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेपर्यंत मी महिला हॉकी फॉलो करत नव्हतो; पण महिला हॉकीसंदर्भात माहिती घेत होतो. वाचायला मिळत होते. मुले असो वा मुली अनेक वर्ष राष्ट्रीय संघाबरोबर राहिल्यावर एक प्रकारचा आत्मविश्‍वास आपल्याला मिळतो आणि त्याच आत्मविश्‍वासाच्या जोरावर महिला संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.’’

भारताच्या कुमारांना जगज्जेते घडविण्यासाठी तीन वर्षे लागली; पण महिला संघाला त्यांनी २३ दिवसांत आशियाई करंडक विजेते बनवले. हरेंद्रसिंग म्हणाले, ‘‘मी कुठल्याच कामगिरीवर समाधानी नसतो. एका यशानंतर आणखी यश मिळविण्यासाठी मी प्रेरित होतो. मला विजय मंचावर येण्यास नेहमीच आवडते.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news asia karandak comeptition