बात्रा, मेहतांच्या निवडीवर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

ऑलिंपिकमध्ये भारताची पदके कशी वाढतील यादृष्टीने माझे अधिक प्रयत्न राहतील. यासाठी क्रीडा मंत्रालयाबरोबर काम करणार आहे. आशियाई, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भारताने भूषविले, आता ऑलिंपिकचे यजमानपद भूषविण्यासाठी देखील प्रयत्न करू. पाकिस्तानबरोबरील क्रीडा संबंधाचा विषय हा त्यांच्याच भूमिकेवर अवलंबून राहील. 
- नरिंदर बात्रा, आयओएचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली - न्यायालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा आणि सचिव राजीव मेहता यांच्या सरचिटणीसपदावर गुरुवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. 

यानंतरही दिल्ली उच्च न्यायालयाने ‘आयओए’ च्या निवडणुकीसंदर्भात प्रलंबित असलेल्या याचिकेच्या निर्णयावर या निवडणुकीच्या निकालाचे भवितव्य अवलंबून असेल, अशी टिप्पणी जोडल्यामुळे सदस्यांच्या बिनविरोध निवडीवरील अनिश्‍चितता कायम राहिली आहे. 

‘आयओए’च्या आज येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणुकीत या दोघांची निवड झाली. बात्रा प्रथमच ‘आयओए’चे अध्यक्षपद भूषवतील, तर मेहता सलग दुसऱ्यांदा सरचिटणीसपद सांभाळतील. आनंदेश्‍वर पांडे ‘आयओए’चे नवे खजिनदार असतील.

क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ता राहुल मेहरा यांनी क्रीडा आचारसंहितेचा भंग होत असल्याने ‘आयओए’ची निवडणूक स्थगित करावी याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी अजून प्रलंबित आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही. ‘आयओए’च्या निवडणुकीत आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. त्यांनी निवडणुकीची कार्यवाही पूर्ण करावी; मात्र या यचिकेवरील सुनावणीनंतर होणाऱ्या अंतिम निर्णयावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल अशी टिप्पणीही न्यायालयाने दिल्यामुळे ‘आयओए’च्या निवडणुकीबाबतची अनिश्‍चितता कायम राहिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news chairman & secretary selection