भारतीय हॉकी संघाचा विजयी सराव

गुरुवार, 15 जून 2017

भारताच्या  साखळी लढती गुरुवार, १५ जून वि. स्कॉटलंड शनिवार, १७ जून वि. कॅनडा रविवार, १८ जून वि. पाकिस्तान मंगळवार, २० जून वि. नेदरलॅंडस सर्व लढती ६.३० पासून थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस्‌ २, स्टार स्पोर्टस्‌ एचडी २ अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीत उपांत्यपूर्व फेरीच्या लढती २२ जूनला; तर उपांत्य लढती २४ जूनला क्रमांक निश्‍चित करणाऱ्या लढती; अंतिम लढत २५ जून रोजी

मुंबई - वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाने विजयी सराव केला; मात्र त्याच वेळी रूपिंदर पाल सिंग आणि एस. के. उथप्पा यांच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघ काहीसा कमकुवत झाला आहे. ही स्पर्धा उद्यापासून (ता. १५) लंडनला सुरू होणार आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पूर्ण साठ मिनिटांचा झाला नाही. त्याऐवजी पंधरा मिनिटांची तीन सत्रेच खेळवण्यात आली. त्यात भारताने ३-१ असा सहज विजय मिळवला. सराव सामन्यातील निकालास फारसे महत्त्व नसले, तरी यजमानांविरुद्धच्या विजयामुळे संघाचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. हरमनप्रीतने दोन आणि मनदीपने एक गोल करीत भारताचा विजय साकारला. भारतास या सामन्यात दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले; तर इंग्लंडने एक मिळवला. 

दरम्यान, अनुभवी ड्रॅग फ्लिकर; तसेच बचावपटू रूपिंदर पाल सिंग आणि मध्यरक्षक एस. के. उथप्पा हे या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. रूपिंदरचा पोटरीचा स्नायू दुखावला आहे; तर उथप्पा घरगुती कारणास्तव मायदेशी परतला आहे. रूपिंदरऐवजी जसजित सिंग कुलरला; तर उथप्पाऐवजी सुमीतला स्थान देण्यात आले आहे. 

जसजित हाही ड्रॅग फ्लिकर आहे. त्याने ४६ आंतरराष्ट्रीय लढतीत पाच गोल केले आहेत; तर विश्‍वविजेत्या कुमार संघातील सुमीत सुलतान अझलन शाह स्पर्धेत खेळला आहे. या दोघांनीही बंगळूरला संघासोबत सराव केला होता. 

आम्ही यंदाचा भरगच्च कार्यक्रम लक्षात घेऊन पर्यायी खेळाडूंबाबत यापूर्वीच विचार केला आहे. आमच्याकडे आता अनेक पर्याय आहेत. त्यामुळे दोघा खेळाडूंच्या अनुपलब्धतेचा नक्कीच फटका बसणार नाही.
- रोएलॅंट ऑल्टमन्स, भारतीय संघाचे मार्गदर्शक