हॉकीमध्ये भारताने पुन्हा पाकिस्तानला नमविले 

Ramandeep Singh
Ramandeep Singh

लंडन : क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची चर्चा अजूनही सुरू असताना भारतीय हॉकी संघाने मात्र जागतिक हॉकी स्पर्धेत दुसऱ्यांदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला. पाचव्या ते आठव्या क्रमांकासाठी खेळत असलेल्या भारताने पाकिस्तानवर आज (शनिवार) 6-1 असा सहज विजय मिळविला. 

कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर भारताने एकाच आठवड्यात दोनदा विजय मिळविले आहेत. यापूर्वी गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7-1 असा विजय मिळविला होता. विशेष म्हणजे, याच दिवशी क्रिकेटमध्ये भारताला चॅंपियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 

पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठीच्या सामन्यात भारताची गाठ उद्या (रविवार) कॅनडाशी पडणार आहे. 

रमणदीपसिंगने सामन्याच्या आठव्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर 12 व्या मिनिटाला आकाशदीपसिंगने ही आघाडी वाढविली. त्यानंतर तलविंदर, हरमनप्रित आणि मनदीपसिंग यांनीही गोल केले. पाकिस्तानचा एकमेव गोल एजाज अहमदने 41 व्या मिनिटाला केला. पण तोपर्यंत पाकिस्तानचा पराभव निश्‍चित झाला होता. 

सामन्यात सुरवातीपासूनच भारताने वर्चस्व राखले होते. त्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना फारसा वाव दिलाच नाही. संपूर्ण सामन्यामध्ये एकदाच भारताच्या बचावपटूंकडून चूक झाली आणि ती संधी पाकिस्तानने साधली. पण हा अपवाद वगळता भारताने पाकिस्तानवर पूर्ण वर्चस्व राखले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com