कर्णधार मनप्रीतमुळे भारताची हार

कर्णधार मनप्रीतमुळे भारताची हार

भुवनेश्वर, मुंबई - गतविजेत्या ऑस्ट्रेलियास रोखलेल्या भारताने दोन गोलांच्या पिछाडीनंतर चांगला प्रतिकार करत बरोबरी साधली; पण कर्णधार मनप्रीतने चार मिनिटे बाकी असताना बचावात केलेल्या चुकीचा फायदा घेत इंग्लंडने गोल केला. याच गोलच्या जोरावर इंग्लंडने वर्ल्ड हॉकी लीगच्या साखळी लढतीत भारतास ३-२ असे हरवले. या पराभवामुळे भारत गटात तळाला गेला आहे. 

कलिंगा स्टेडियमवरील ही लढत भारतीय प्रतिकाराची कहाणी ठरणार, असेच वाटत होते. खरे तर ४७ व्या मिनिटापर्यंत भारत दोन गोलने मागे होता; पण आकाशदीप आणि रूपिंदरने तीन मिनिटांच्या अंतराने गोल करत भारतास स्वप्नवत बरोबरी साधून दिली. भारताच्या या प्रतिकाराने इंग्लंडही धास्तावले होते. 

भारताच्या बरोबरीनंतर इंग्लंडने जोरदार आक्रमणे सुरू केली. रूपिंदरने सुरवातीस बॅरी मिडलटनला गोलपासून रोखले. त्यानंतर भारतीय इंग्लंडची आक्रमणे रोखत होते. इंग्लंड त्या वेळी हतबल झाले, असे वाटत असतानाच मनप्रीत गोलक्षेत्राजवळ चेंडूवर ताबा राखण्यात अपयशी ठरला. सॅम्युएल वॉर्डने लगेचच चेंडूवर ताबा घेतला. तीन मार्करना सहज चकवत त्याने अर्धवर्तुळावरून चेंडू थेट गोलजाळ्यात धाडला.  पिछाडीनंतर भारतीय जास्त आक्रमक झाले. त्यांनी आक्रमणाची ताकद वाढवण्यासाठी गोलरक्षकासच बाहेर काढले; मात्र याचा फायदा इंग्लंडच घेत असल्याचे दिसले; पण गोलफलक बदलला नाही. पहिल्या दोन सामन्यांत अवघा एक गुण मिळवलेला भारत गटात तळाला गेला आहे. आघाडीवरील जर्मनीचे चार गुण आहेत. त्यांच्याविरुद्धच भारताची अखेरची साखळी लढत रविवारच्या विश्रांतीनंतर होईल. 

भारतीयांना खरे तर पहिल्या दोन सत्रातील सदोष खेळाचा फटका बसला. चेंडूवर जास्त वर्चस्व राखले. गोलच्या जास्त संधी निर्माण केल्या; पण परस्परांतील सामंजस्याचा गोलक्षेत्रात अभाव असल्यामुळे भारतास गोल स्वीकारावे लागले, तसेच गोल करण्यात अपयश आले. चौथ्या सत्रातील प्रतिकार सुखावणारा असला तरी त्यापूर्वीचे अपयश हॉकीप्रेमी नक्कीच विसरणार नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com