मलेशियाची भारताबरोबर लढत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई / लंडन - वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यात पहिल्या दोन संघांत स्थान मिळवण्याच्या लक्ष्याच्या दिशेने भारत उद्या एक भक्कम पाऊल टाकू शकेल. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची त्यांच्यापेक्षा कमकुवत असलेल्या मलेशियाविरुद्ध लढत होईल.

मुंबई / लंडन - वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यात पहिल्या दोन संघांत स्थान मिळवण्याच्या लक्ष्याच्या दिशेने भारत उद्या एक भक्कम पाऊल टाकू शकेल. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची त्यांच्यापेक्षा कमकुवत असलेल्या मलेशियाविरुद्ध लढत होईल.

जागतिक क्रमवारीत भारत मलेशियापेक्षा नक्कीच सरस आहे; पण नुकत्याच झालेल्या सुलतान अझलन शाह स्पर्धेत मलेशियाने भारतास १-० असा धक्का दिला होता. त्यामुळे भारताची स्पर्धेची अंतिम फेरी हुकली होती. अर्थातच, या विजयाची पुनरावृत्ती टाळण्याचा भारताचे उद्दिष्ट असेल.  वर्ल्ड हॉकी लीगच्या अंतिम टप्प्यासाठी या स्पर्धेतील अव्वल चार संघ पात्र ठरतील. यजमान असल्याने भारताचा प्रवेश नक्की आहे; पण उद्याची लढत जिंकून या स्पर्धेत खेळण्याचा आपला हक्क आहे, हे भारतीय संघ दाखवू शकेल. ऑलिंपिक विजेत्या नेदरलॅंडस्‌ला कडवी लढत दिल्यामुळे भारताचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. नेदरलॅंडस्‌विरुद्ध आमचा बचाव चांगला झाला. नावाजलेल्या संघाविरुद्ध खेळण्याचे दडपण असूनही गोलरक्षकाने चांगली कामगिरी केली, असे भारतीय मार्गदर्शक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी सांगितले. 

कोरिया आणि चीन या आशियाई प्रतिस्पर्ध्यांना हरवून मलेशियाने बाद फेरी गाठली आहे. भारताविरुद्ध त्यांचा खेळ कायम उंचावतो. मात्र, या स्पर्धेत भारताचा २५ यार्ड क्षेत्रात उंचावलेला खेळ मलेशियाची चिंता वाढवत असेल. अझलन शाह स्पर्धेनंतर भारताने यावर लक्ष केंद्रित केले आहे. 

मलेशियाचा संघ चांगला आहे. त्यांनाच काय कोणत्याही संघाला कधीही कमी लेखण्याचा प्रश्‍नच येत नाही. या स्पर्धेत खेळ चांगला होत असला, तरी चांगली सुरवात आणि शेवट चांगला होण्यासाठी सातत्य राखण्याची आवश्‍यकता आहे. बाद फेरीच्या लढतीत एखादी चूकही भोवते.
- रोएलॅंट ऑल्टमन्स, भारतीय मार्गदर्शक

वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरी
आजचा सामना - भारत वि. मलेशिया
थेट प्रक्षेपण- रात्री ८ पासून स्टार स्पोर्ट्‌स २
दोघांतील ११३ पैकी ७९ लढतींत भारताची सरशी
मलेशियाविरुद्ध भारताचे १० पराभव आणि १८ बरोबरी
विश्वकरंडक, आशियाई, ऑलिंपिक यांसारख्या स्पर्धांत भारताचा २५ पैकी १८ सामन्यांत विजय व ३ पराभव
उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढती - अर्जेंटिना वि. पाकिस्तान, नेदरलॅंड्‌स वि. चीन, इंग्लंड वि. कॅनडा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news malesia & india hockey competition