सदोष खेळानंतरही भारतास ब्राँझपदक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

मुंबई - भारतीयांनी गोल करण्याच्या संधी लागोपाठ दवडल्या. प्रतिस्पर्ध्यांच्या राखीव गोलरक्षकास गोल करू दिला; पण तरीही भारताने जर्मनीचा २-१ असा पराभव केला आणि भुवनेश्‍वर येथे सुरू असलेल्या वर्ल्ड हॉकी फायनल्स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले.

मुंबई - भारतीयांनी गोल करण्याच्या संधी लागोपाठ दवडल्या. प्रतिस्पर्ध्यांच्या राखीव गोलरक्षकास गोल करू दिला; पण तरीही भारताने जर्मनीचा २-१ असा पराभव केला आणि भुवनेश्‍वर येथे सुरू असलेल्या वर्ल्ड हॉकी फायनल्स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले.

आकाशदीपच्या रिव्हर्स पासवर एस. व्ही. सुनीलने विश्रांतीपूर्वी भारताचे खाते उघडले. हरमनप्रीतने सामन्यातील अखेरच्या मिनिटात गोल करत विजय साकारला; पण लक्षात राहिला तो प्रत्यक्षात बदली गोलरक्षक असलेला; पण तरीही मार्क ॲपेल याने केलेला गोल. जर्मनी संघातील अनेक खेळाडू आजारी आहेत. त्यांच्या संघात या लढतीच्यावेळी अकराच खेळाडू उपलब्ध होते आणि त्यात दोन गोलरक्षक होते. सेंटर स्ट्राइकर म्हणून खेळणाऱ्या मार्कने हरमनप्रीत आणि वरुण कुमार या भारतीय बचावपटूंना गोलक्षेत्रात चकवताना दाखवलेले कौशल्य जबरदस्त होते. 

भारताने ही लढत जिंकत ब्राँझ जिंकले, त्याबद्दल ओडिशा सरकारने त्यांना प्रत्येकी दहा लाखाचे बक्षीसही दिले; पण हा विजय प्रश्‍नच जास्त निर्माण करत होता. ॲस्ट्रोटर्फवर खेळाडू जास्त थकतात, त्यामुळे खेळाडू सतत बदलण्याचा पर्याय आहे; पण जर्मनीचा संघ खेळाडू न बदलताच खेळला. त्यांचे सहा प्रमुख खेळाडू मैदानात नव्हते, तरीही भारताची दमछाक झाली. अर्थात गटात शेवटचे आल्यानंतरही मिळवलेले ब्राँझ भारतास समाधान देणारे असेल. 

सामन्याची आकडेवारीच भारताच्या चुका दाखवते. सुनीलने निष्कारण पिवळे कार्ड ओढवून घेतले. गोलक्षेत्रात वीस वेळा प्रवेश केलेल्या भारताने गोलच्या दिशेने बाराच शॉटस्‌ मारले, तर जर्मनीने तेरा वेळा गोलक्षेत्रात प्रवेश केल्यावर गोलचे तेरा प्रयत्न केले. जर्मनीने सात पेनल्टी कॉर्नर मिळवत भारताच्या मर्यादा दाखवल्या. भारताला पूर्वार्धात एकही पेनल्टी कॉर्नर मिळवता आला नव्हता. भारताच्या तिघांना पिवळे कार्डला सामोरे जावे लागले, तर जर्मनीच्या एकाही खेळाडूस नाही.

सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलिया विजेते
ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत सलग दुसऱ्या वर्षी हॉकी वर्ल्ड लीगचे विजेतेपद पटकाविले. त्याचबरोबर वर्ल्ड हॉकी लीग जिंकणारा ऑस्ट्रेलिया अखेरचा संघही ठरला. पुढील मोसमापासून ही स्पर्धा बंद करण्याचा विचार आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ करत आहे. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव केला. पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावण्यात ऑस्ट्रेलियाला आलेले यश हेच त्यांच्या विजेतेपदाचे वैशिष्ट्य ठरले. सतराव्या मिनिटाला जेर्मी हेवर्डने कॉर्नरवर ऑस्ट्रेलियाला आघाडीवर नेले. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला ऑगस्टीन बुगालो याने अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. मात्र, सामना संपण्यास दोन मिनिटे असताना मिळालेल्या कॉर्नर ब्लेक गोव्हर्सने सत्कारणी लावताना ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news world hockey league competition