आशेचा किरण घेऊन ‘तो’ धावतोय

नागेश पाटील - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

चिपळूण - जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेतल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवता येते. ही उक्‍ती अनारीतील अविनाश पवार याने धावण्याच्या स्पर्धांत मिळवलेल्या यशाने सिद्ध केली. २०१२ पासून त्याला आस लागली आहे ती धावण्याची. तंत्रशुद्ध धावण्याचे प्रशिक्षण मिळाले तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तो यश संपादन करू शकतो; मात्र ग्रामीण भागातील प्रत्येक खेळाडूला असणारा गरिबीचा शाप त्यालाही आहे. 

चिपळूण - जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेतल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवता येते. ही उक्‍ती अनारीतील अविनाश पवार याने धावण्याच्या स्पर्धांत मिळवलेल्या यशाने सिद्ध केली. २०१२ पासून त्याला आस लागली आहे ती धावण्याची. तंत्रशुद्ध धावण्याचे प्रशिक्षण मिळाले तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तो यश संपादन करू शकतो; मात्र ग्रामीण भागातील प्रत्येक खेळाडूला असणारा गरिबीचा शाप त्यालाही आहे. 

अनारी येथील अविनाश गजानन पवार शाळेत खो-खो खेळायचा. त्याच्या चपळाईच्या जोरावर शाळा तालुकास्तरावर कायम जिंकायची. कनिष्ठ महाविद्यालयात शिकताना स्थानिक, विद्यापीठ स्पर्धेत त्याला यश मिळाले. धावण्याच्या स्पर्धेत आपण कामगिरी करू शकतो, हे त्याने ओळखले व कसून सराव सुरू केला. अविनाशचे आई, वडील शेतकरी आहेत. मोठा भाऊ मुंबईत नोकरी करतो. गरिबीमुळे आयटीआयचे शिक्षण झाल्यावर अविनाश खेर्डीतील पेपर मिलमध्ये नोकरी करतो. पेढांबे महाविद्यालयात कला शाखेचे शिक्षणही घेतो. सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी नोकरी केल्यावर सायंकाळी ५.३० ते ७.३० पर्यंत चिपळुणातील पवन तलाव मैदानावर तो सराव करतो. धावपटूसाठी नियमित व्यायाम व सरावाबरोबर योग्य आहाराची गरज असते; परंतु अंडी, केळी, बदाम असा प्रथिनेयुक्‍त आहार त्याला रोज परवडत नाही. तंत्रशुद्ध धावण्यासाठी प्रशिक्षकाला द्यायला त्याच्याकडे पैसे नाहीत.

डीबीजे महाविद्यालयातील क्रीडाशिक्षक प्रा. कांबळे व प्रा. मोहिते त्याला स्पर्धांची माहिती देतात. खेर्डीतील जिजाऊ कला, क्रीडा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पालांडे या स्पर्धांमधून सहभागी होण्यासाठी आर्थिक सहकार्य करतात. कधीतरी एक संधी यशाचा मार्ग दाखवेल, आपल्यातील गुणांचे चीज होईल या आशेने तो धावतोच आहे.  

मॅरेथॉनमध्ये पन्नासांवर पदके...
२०१२ ला रोटरीच्या मॅरेथॉनमध्ये त्याला पाचवा क्रमांक मिळाला. २०१३ ला जिल्हास्तरीय मॅरेथॉनमध्ये तो तिसरा आला. २०१३ ला मुंबई विद्यापीठाच्या मॅरेथॉन व ८०० मीटरमध्ये पहिला, तर १५०० मीटरमध्ये दुसरा क्रमांक त्याने मिळवला. विभागस्तरावर ४०० मीटर स्पर्धेत तो दुसरा आला. रायगड ट्रेकिंग स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले. विद्यापीठ विभागस्तरावर १० किमी स्पर्धेत तिसरा क्रमांक, २१ किमी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याने मुंबई विद्यापीठातून अविनाशची निवड राष्ट्रीय स्तरावरील क्रॉसकंट्रीसाठी झाली. पुणे व रत्नागिरीतील स्पर्धेत पहिला, मुंबईत व जेजुरी येथे दुसरा क्रमांक मिळवला. सुमारे ५० हून अधिक मॅरेथॉन स्पर्धेत त्याने नेत्रदीपक कामगिरी केली.

Web Title: avinash pawar With a ray of hope