अबब! औरंगाबादचे सहा जण आयर्नमॅन झाले? कोण कोण?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

आयर्नमॅन शर्यत ही 70.3 मैल अंतराची स्पर्धा होती. या स्पर्धेत 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग करणे आणि 21.1 किलोमीटर धावण्याचा समावेश होता. नितीन घोरपडे यांनी तिसऱ्यांदा हा किताब पटकावत या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले.

औरंगाबाद : भारतात प्रथमच गोवा येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत औरंगाबादच्या नितीन घोरपडे, अर्शद यारखान, सागर तोलवाणी, कफील जमाल, जस्मितसिंग सोधी आणि सुजित सिंग यांनी यश मिळवत आयर्नमॅन किताब पटकावला. 

Image result for iron man goa

आयर्नमॅन शर्यत ही 70.3 मैल अंतराची स्पर्धा होती. या स्पर्धेत 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग करणे आणि 21.1 किलोमीटर धावण्याचा समावेश होता. नितीन घोरपडे यांनी तिसऱ्यांदा हा किताब पटकावत या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी डेन्मार्क, हॅम्बुर्ग व आता गोवा अशा तीन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत हा किताब संपादन केला आहे. इतर स्पर्धकांनी प्रथमच आयर्नमॅन हा किताब पटाकावला आहे.

आयर्नमॅन ही स्पर्धा कधीही जलतरण तलावात होत नाही. त्यासाठी समुद्र अथवा नदीचे पात्र निवडले जाते. यावर्षी लांबलेल्या पावसामुळे खवळलेला समुद्र हा स्पर्धकांसाठी एक मोठे आव्हानच होते. सायकलिंगसाठी चढउताराचा रस्ता व धावण्यासाठी चढउतारासह समुद्रकिनाऱ्यावरील दमट, उष्ण हवामानाचा सामना स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना करावा लागला. 

Image result for milind soman iron man

असा बनला होता मिलिंद सोमण 'आयर्नमॅन'

बॉलिवूड अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण याने 2018 मध्ये तंदुरुस्तीची कस लावणारी ट्रायथॅलॉन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार केली होती. ट्रायथलॉन ही जगातील सर्वांत अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाते. 

Related image

झ्युरीचमध्ये झालेल्या या स्पर्धेत 50 वर्षीय मिलिंद सोमण याच्यासह सहा भारतीय नागरिक व देशविदेशातील दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. मिलिंद सोमणने ही सर्व आव्हाने यशस्वीरित्या पार केली. ट्रायथलॉनमध्ये 3.8 किमी पोहणे, 180.2 किमी सायकल चालविणे आणि 42.2 किमी धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धकाने हे सर्व सलग न थांबता करायचे असतात. ही तिन्ही आव्हाने पार करणाऱ्याला "आयर्नमॅन' हा किताब दिला जातो.

स्पर्धकांना ही ट्रायथलॉन 16 तासांमध्ये पूर्ण करणे गरजेचे असते. मिलिंदने 15 तास 19 मिनिटांमध्ये ती पार केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या 7 पैकी 5 भारतीय स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. पुण्याच्या डॉ. कौस्तुभ राडकर याच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी हे यश मिळविले होते. कौस्तुभने आतापर्यंत बारा वेळा "आयर्नमॅन' हा किताब मिळविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Athletes completed Iron Man race