राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचा आज ठरणार विजेता

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 5 November 2019

ही स्पर्धा पाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट शास्त्र महाविद्यालयाने उभारलेल्या प्रेक्षा गॅलरीतून क्रीडारसिक राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना टाळ्यांच्या गजरात आणि शिट्यांनी प्राेत्साहन देत आहेत. स्पर्धा काेण जिंकणार याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. तसेच काहींनी तर पैजा ही लावल्या आहेत.

सातारा ः कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विवेक बडेकर आणि तेजराज मांढरे यांनी दीप अवकीरकर, यशराज राजेमहाडीक, धवल शेलार, प्रथमेश मनवे यांच्या साथीने येथे सुरु असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीत बहारदार खेळ करीत मुबंई विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फादर ऍग्नेल स्कूलचा 69-48 असा तब्बल 21 गुणांनी पराभव केला.

मुलींच्या गटात मात्र यजमान कोल्हापूर विभागातील वारणा महाविद्यालय संघास नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजकडून 58-42 असा 16 गुणांनी पराभव झाला.

ही स्पर्धा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकूल येथे घेण्यात येत आहे.

स्पर्धेतील बाद फेरीतील सामन्यांत मुलांच्या गटात औरंगाबाद विभागाने नागपूर विभागाचा 64 -41, मुंबई विभागाने नाशिक विभागाचा 48 - 18 असा पराभव केला. मुलींच्या गटात मुंबई विभागाने लातूर विभागाचा 28 - 08, पुणे विभागाने औरंगाबाद विभागाचा 68 - 44 असा पराभव केला.

आज (मंगळवार) सकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्य फेरीचे सामन्यांचा निकाल असा मुले : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा (कोल्हापूर विभाग) 69 वि.वि. फादर आग्नेल स्कूल, वाशी (मुंबई विभाग) 48

डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज, पुणे (पुणे विभाग) 56 वि.वि. देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद (औरंगाबाद विभाग) 49. पुण्याकडून गौतम कुलकर्णी, ज्ञानेश पाटील, यश माने, ओजस आंबेडकर तर औरंगाबादकडून एस.रोहित, रचित, प्रज्वल यांनी उत्तम खेळ केला.

मुली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, नागपूर (नागपूर विभाग) 58 वि.वि. वारणा महाविद्यालय, वारणा (कोल्हापूर विभाग) 42. या सामन्यांत नागपूरच्या देवश्री आंबेगावकर, एस. वैदेही, आभा लाड, नम्रता देसाई यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. कोल्हापूरच्या कोमल सिद आणि प्रिया कोळेकर यांनी सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

फर्ग्यसुन कॉलेज, पुणे (पुणे विभाग) 68 वि.वि. आर. ए. पोदार कॉलेज, माटूंगा (मुंबई विभाग) 44. या सामन्यांत पुण्याच्या संस्कृती पवार, गायत्री मारणे, सानिका किरड तसेच डी. सानिका यांनी तसेच मुंबईच्या सुझेन पिंटो, एम.मेलडी तसेच अक्षता यांनी उत्तम खेळ केला.

आज (मंगळवार) सायंकाळी पाच वाजल्यापासून सामन्यांना प्रारंभ होईल. यामध्ये तृतीय स्थानासाठी सायंकाळी पाच वाजता मुलींच्या गटात वारणा महाविद्यालय, वारणा (कोल्हापूर विभाग) विरुद्ध आर. ए. पोदार कॉलेज, माटूंगा (मुंबई विभाग) आणि मुलांच्या गटात फादर आग्नेल स्कूल, वाशी (मुंबई विभाग) विरुद्ध देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद (औरंगाबाद विभाग) यांच्यात सामना हाेईल. 

त्यानंतर सायंकाळी सहा वाजता अंतिम सामन्यांस प्रारंभ हाेईल. पहिला अंतिम सामना मुलींच्या गटात फर्ग्यसुन कॉलेज, पुणे (पुणे विभाग) विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, नागपूर (नागपूर विभाग) यांच्यात हाेईल.  

त्यानंतर सायंकाळी सात वाजता मुलांच्या गटात यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा (कोल्हापूर विभाग) विरुद्ध डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज, पुणे (पुणे विभाग) यांच्यात सामना हाेईल अशी माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयातून देण्यात आली.

  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finals of the state level school basketball tournament will be played today