क्रिकेट समालोचक अंकुश निपाणीकरांची छाप

राजेश मोरे
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

कोल्हापूर - सामन्याचा आँखो देखा हाल, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समयसूचकतेने मांडलेले संदर्भ, हलके फुलके विनोद, अशा अनोख्या शैलीतून केलेल्या समालोचनाद्वारे क्रिकेट सामन्याला गर्दी खेचणारा समालोचक म्हणून अंकुश निपाणीकर यांनी ओळख निर्माण केली आहे.

कोल्हापूर - सामन्याचा आँखो देखा हाल, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समयसूचकतेने मांडलेले संदर्भ, हलके फुलके विनोद, अशा अनोख्या शैलीतून केलेल्या समालोचनाद्वारे क्रिकेट सामन्याला गर्दी खेचणारा समालोचक म्हणून अंकुश निपाणीकर यांनी ओळख निर्माण केली आहे. खेळाडू ते समालोचक अशा दोन तपांहून अधिक काळ ते क्रिकेटशी जोडले गेले आहेत.  

राजारामपुरीत राहणारे अंकुश निपाणीकर यांना लहानपणीच क्रिकेटची आवड निर्माण झाली. क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून नाव कमवायचे, असा ध्यास त्यांनी घेतला. ते १९९० मध्ये शाहू मिल कॉलनीतील शाहू स्पोर्टस्‌ क्‍लबमधून खेळू लागले. मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज म्हणून ते पॅकर्स क्रिकेट क्‍लबशी जोडले गेले. त्यांनी कॉमर्स कॉलेजच्या संघात प्रवेश मिळविला.

केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर समालोचक म्हणूनही क्रिकेटमध्ये करिअर करता येते. नवोदित समालोचकांना मार्गदर्शन करण्याचे काम गुरू सुनील घोडके यांच्याबरोबर करीत आहे.
- अंकुश निपाणीकर, समालोचक

जिल्ह्यासह बेळगाव, धारवाड, मिरज, सांगली आदी भागांत झालेल्या सामन्यांत त्यांनी चांगली कामगिरी केली. क्रिकेटचे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात करण्यासाठी ते टीव्हीवरील क्रिकेटचे सामने पाहू लागले. त्यात इंग्रजी भाषेत समालोचन करणाऱ्या टोनी ग्रेग यांची त्यांच्यावर छाप पडत गेली; परंतु विद्यापीठ संघात त्यांची निवड होऊ शकली नाही.  

मैदानात सराव करताना निपाणीकर समालोचनही करू लागले. गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनाही ते मनोरंजनात्मक समालोचनातून प्रोत्साहन देऊ लागले. त्यांचे कौतुक होऊ लागले. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ समालोचक सुनील घोडके यांच्याकडून धडे घेतले. शास्त्रीनगर मैदानावर २००४ मध्ये क्रिकेटचे सामने सुरू होते. तेथे मराठीतून समालोचन करणाऱ्या समालोचकाची उणीव भासत होती. त्या वेळी त्यांना आर. ए. पाटणकर, चेतन चौगुले, संजय कदम, काका पाटील, श्रीधर गाडगीळ आदींनी प्रोत्साहन दिले. त्या जोरावर सामन्याच्या समालोचनाची जबाबदारी निपाणीकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्यानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. टीव्हीवर रवी शास्त्री, संजय मांजरेकर करीत असलेल्या समालोचनाचा अभ्यास करून त्यांनी मराठीसह हिंदी, इंग्रजीतून सामन्यांच्या समालोचनास सुरवात केली. 

शहर, जिल्ह्यासह राज्यातील विविध क्रिकेट सामन्यांत आणि खास करून ‘आरपीएल’ स्पर्धेत निपाणीकरांनी समालोचक म्हणून उल्लेखनीय भूमिका बजावली. अनोखी शैली, प्रत्येक चेंडूचे शास्त्रशुद्ध वर्णन, खेळाडूंची खासियत, आंतरराष्ट्रीय सामन्यातील संदर्भ, मैदानासह अन्य सामन्यांत घडलेले हलके फुलके विनोद अशा मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर करण्याची पद्धत आणि समयसूचकतेने केलेल्या समालोचनाने मैदानातील प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्याची कसब त्यांनी आत्मसात केली. अखेरच्या चेंडूपर्यंत मैदानातील प्रेक्षक बाहेर जाणार नाहीत, तर रस्त्यावरील क्रीडाप्रेमींची पावले मैदानाकडे वळविण्यास भाग पाडण्याचे काम त्यांच्या समालोचनातून होऊ लागले. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट, आरपीएल क्रिकेट सामन्यांत त्यांनी समालोचकाची छाप पाडली. चाटे स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतानाही डॉ. भारत खराटे यांच्या प्रोत्साहनातून त्यांनी समालोचकाची कला अखंडित जोपासली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News commentator Ankush Nipanikar story