खेलो इंडिया स्पर्धेसाठी आठ क्रीडा प्रकारांना कात्री

संदीप खांडेकर
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

कोल्हापूर - राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडियांतर्गत होणाऱ्या चोवीस क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेसाठी आठ क्रीडा प्रकारांना कात्री लावली असून सोळा क्रीडा प्रकारांत ही स्पर्धा होणार आहे. 

कोल्हापूर - राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडियांतर्गत होणाऱ्या चोवीस क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेसाठी आठ क्रीडा प्रकारांना कात्री लावली असून सोळा क्रीडा प्रकारांत ही स्पर्धा होणार आहे. ‘वाइल्ड ग्रीन कार्ड’नुसार खेळाडू व संघांना स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे ‘जो खेले वो खिले’ हे ब्रीद घेऊन होत असलेल्या या स्पर्धेत खेळाडू व संघांना स्पर्धेपासून वंचित ठेवण्यास जागाच शिल्लक राहणार आहे. 

मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्टस्‌तर्फे नवी दिल्लीमध्ये ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा होत आहे. १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी २४ क्रीडा प्रकारांची निवड केली. मात्र पुन्हा या स्पर्धेंतर्गत बदल करताना सोळा क्रीडा प्रकार निश्‍चित केले आहेत. 

धनुर्विद्या, जिम्नॅस्टिक्‍स, वेटलिफ्टिंग, हॉकी, ॲथलेटिक्‍स, ज्युदो, कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन, नेमबाजी, बास्केटबॉल, खो-खो, मुष्टियुद्ध, जलतरण, फुटबॉल, व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांचा सोळा क्रीडा प्रकारांत समावेश केला. 

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे होणाऱ्या स्पर्धेतून चार शालेय संघ व चार खेळाडूंचा खेलो इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश होणार आहे. प्रत्येक खेळाडूच्या राष्ट्रीय संघटनेकडून दोन खेळाडू व दोन संघ स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत. त्याचबरोबर यजमानपद भूषविणाऱ्या आयोजक राज्याला त्या त्या खेळात आपला एक संघ व एक खेळाडू सहभाग करण्याची सवलत दिली आहे. 

ऑर्गनायझिंग कमिटीलासुद्धा एक संघ व एक खेळाडू स्पर्धेत सहभागी करण्याची संधी दिली. त्यामुळे एखादा खेळाडू व संघ यांच्यावर एखाद्या घटकाकडून अन्याय होत असल्याची भावना असल्यास तो आयोजक राज्य अथवा ऑर्गनायझिंग कमिटीकडून स्पर्धेत प्रवेश करता येणार आहे.  

न्यू दिल्ली : ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१८

स्पर्धेची ठिकाणे 

  •  जवाहरलाल नेहरू स्टेडियम
  •  डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्विमिंग कॉम्प्लेक्‍स
  •  मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम
  •  इंदिरा गांधी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स

वाइल्ड ग्रीन कार्डनुसार यांना होता येईल स्पर्धेत सहभागी  

  •  गतवर्षीचा पदक विजेता असला पाहिजे
  •  राष्ट्रीय ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होता
  •  आंतरराष्ट्रीय ट्रेंनिग कॅम्पमध्ये सहभागी होता
  •  दुखापतग्रस्त/जखमी होता
Web Title: Kolhapur News Kelo India competition