कोल्हापूर क्रीडा प्रबोधिनीला मिळेना रेक्‍टर, लिपिक, वाहनचालक

संदीप खांडेकर
मंगळवार, 23 जानेवारी 2018

कोल्हापूर - जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा प्रबोधिनीत खेळाडूंची संख्या बावीस. नेमबाजीसाठी ५ निवासी व ५ अनिवासी. कुस्तीपटूंचा आकडा बारा. पैकी एक अनिवासी. असे असताना रेक्‍टर, वरिष्ठ लिपिक, कामगार व वाहनचालकाचा पत्ताच नाही, अशी स्थिती क्रीडा प्रबोधिनीची आहे.

कोल्हापूर - जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा प्रबोधिनीत खेळाडूंची संख्या बावीस. नेमबाजीसाठी ५ निवासी व ५ अनिवासी. कुस्तीपटूंचा आकडा बारा. पैकी एक अनिवासी. असे असताना रेक्‍टर, वरिष्ठ लिपिक, कामगार व वाहनचालकाचा पत्ताच नाही, अशी स्थिती क्रीडा प्रबोधिनीची आहे.

नेमबाजांना ॲम्युनेशन मिळत नसल्याची पालकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे क्रीडा उपसंचालक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेले अजित पाटील नेमबाजीवरील प्रेमापोटी नेमबाजांना प्रशिक्षण देतात. 

क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू असे : 

  •   नेमबाज - वीरभद्र साळोखे, सुशांत हातकर, कुणाल पालकर, कुणाल ससे, यश साळोखे (निवासी), अनुष्का पाटील, अभिज्ञा पाटील, शिवराज शिंदे, विराज रोकडे, शामली घाडगे (अनिवासी). 

  •  कुस्ती - तेजस गावडे, करण डापकर, ओंकार सुतार, मनोज जाधवर, कल्पना पवार, हर्षवर्धन पाटील, ऋषीकेश जाधव, प्रथमेश पाटील, यश महाळे, संकेत पाटील, दीपक पाटील (निवासी), धैर्यशील सकटे (अनिवासी).

जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू. कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा कार्यालयाचे त्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून कार्यभार पाहिला. पुढे त्यांची मुंबईला बदली झाली आणि गडचिरोलीत काम केलेले माणिक वाघमारे यांनी जिल्हा क्रीडाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. श्री. फरताडे क्रीडा कार्यालयाच्या सेवेत येण्यापूर्वी क्रीडाधिकारी सुभाष पवार यांनी सुमारे साडेचार वर्षे प्रबोधिनीचे प्राचार्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर श्री. फरताडे यांच्याकडे प्रबोधिनीच्या प्राचार्यपदाचा अतिरिक्त भार दिला.

प्रबोधिनीतील खेळाडूंना कोणत्या सुविधा हव्यात, याची आम्ही माहिती घेतो. नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत नेमबाजांना दिलेल्या ॲम्युनेशनची यादी आमच्याकडे आहे.
- प्रवीण कोंडावळे,
प्रशिक्षक.
 

श्री. वाघमारे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रबोधिनीचे ते प्राचार्य झाले. आता प्रबोधिनीत बावीस खेळाडू असले तरी प्रबोधिनीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील हॉस्टेलमध्ये रेक्‍टर, लिपिक, कामगार, वाहनचालक नसल्याची स्थिती आहे. ही पदेच कमी झाल्याने हॉस्टेलमधील खेळाडूंवर धाक कुणाचा असाच प्रश्‍न आहे. 

प्रबोधिनीतील खेळाडूंना सोयी-सुविधा पुरविण्यात आम्ही कमी पडत नाही. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवावीत, असाच आमचा प्रयत्न राहिला आहे.
- माणिक वाघमारे,
जिल्हा क्रीडाधिकारी.

अजित पाटील यांनी प्रबोधिनीचे अनेक वर्षे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांची क्रीडा उपसंचालक कार्यालयात लिपिक म्हणून बदली झाली. तरीही ते प्रशिक्षक म्हणून नेमबाजांना प्रशिक्षण देत आहेत. कायमस्वरूपी प्रशिक्षकाची शूटिंग रेंजला आवश्‍यकता आहे. तशी मागणी क्रीडा कार्यालयाकडून क्रीडा संचालक कार्यालयाकडे झाली असली तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रबोधिनीत मनुष्यबळाच्या कमतरतेकडे क्रीडा संचालक कार्यालयाला गांभीर्य नसल्याचे दिसते. शासकीय प्रशिक्षक प्रवीण कोंडावळे यांच्याकडे प्रबोधिनीच्या कामकाजाची जबाबदारी नोव्हेंबर २०१७ पासून आहे. 

Web Title: Kolhapur News Krida Prabhodhini issue