केएसए चषकावर पाटाकडीलचेच नाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - पाटाकडील तालीम मंडळाने (अ) प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबवर (अ) गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या फुटबॉल सामन्यात टॉसवर विजय मिळवून सलग चौथ्यांदा केएसए चषकावर नाव कोरले. प्रॅक्‍टिसच्या जिगरबाज खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण ठेवत अप्रतिम खेळ केला, तर पाटाकडीलच्या खेळाडूंना गोलसाठी अखेरच्या क्षणापर्यंत झुंजावे लागले.

कोल्हापूर - पाटाकडील तालीम मंडळाने (अ) प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबवर (अ) गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या फुटबॉल सामन्यात टॉसवर विजय मिळवून सलग चौथ्यांदा केएसए चषकावर नाव कोरले. प्रॅक्‍टिसच्या जिगरबाज खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण ठेवत अप्रतिम खेळ केला, तर पाटाकडीलच्या खेळाडूंना गोलसाठी अखेरच्या क्षणापर्यंत झुंजावे लागले.

टॉसवर विजेते झाल्यानंतर पाटाकडीलच्या समर्थकांनी जल्लोष केला. पराभवाला सामोरे जावे लागल्याने प्रॅक्‍टिसच्या खेळाडूंसह समर्थकांना निराशा लपवता आला नाही. कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनतर्फे केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा झाली. 

केएसए चषकावर प्रॅक्‍टिस की, पाटाकडील नाव कोरणार, या उत्सुकतेने प्रेक्षकांनी दुपारी तीन वाजताच स्टेडियमवर हजेरी लावली. सामना सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके वाढण्यास सुरुवात झाली. पाटाकडील व प्रॅक्‍टिसच्या समर्थकांकडून टाळ्या व शिट्यांचा जोर सुरू झाला. प्रॅक्‍टिसने डावपेचांचे सूत्र बदलल्याने पाटाकडीलच्या खेळाडूंची कोंडी झाली. 

सुरुवातीच्या दहा मिनिटांत प्रॅक्‍टिसने चेंडूवर नियंत्रण ठेवत शॉर्ट पास दिले. त्यांच्या राहुल पाटीलने पाटाकडीलच्या गोलक्षेत्रातून मारलेल्या चेंडूने प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. चेंडू गोलजाळीजवळून गेल्यानंतर प्रॅक्‍टिसच्या समर्थकांतून टाळ्यांचा कडकडाट झाला. पाच मिनिटांच्या अंतराने पुन्हा राहुलने फ्री किकवर मारलेला चेंडू पाटाकडीलचा गोलरक्षक विशाल नारायणपुरेने अडवला. तो चेंडू मैदानात परतल्याने त्याला सुशील सावंतने फटका मारला. गोलजाळीकडे जाणारा चेंडू पाटाकडीलच्या खेळाडूने अडवला.

या चढाईनंतर पाटाकडीलकडून ओंकार जाधवने प्रॅक्‍टिसच्या गोलक्षेत्रातून मारलेला चेंडू गोलजाळीवरून गेला. त्यानंतर खेळ संथ झाला. प्रॅक्‍टिसच्या माणिक पाटीलने फ्री किकवर मारलेला चेंडू थेट गोलरक्षक विशालच्या हातात विसावल्यानंतर पुन्हा सामन्यात रंग भरला. प्रॅक्‍टिसच्या प्रथमेश यादवच्या पासवर प्रतीक बदामेने हेडद्वारे चेंडूला पाटाकडीलच्या गोलजाळीत ढकलण्याचा प्रयत्न केला. ‘प्लेअर टू प्लेअर’ हे सूत्र प्रॅक्‍टिसच्या खेळाडूंनी अवलंबल्याने ऋषीकेश मेथे-पाटील, ओंकार पाटील, ओंकार जाधव यांची चांगलीच कोंडी झाली; मात्र या वेळेत पाटाकडीलच्या ऋषभ ढेरे व ओंकार जाधवने केलेल्या चढाया समर्थकांना दिलासा देणाऱ्या ठरल्या. 

उत्तरार्धात प्रॅक्‍टिसने मध्यफळीतला उत्कृष्ट खेळाडू अजित पोवार याला मैदानात उतरवले. या वेळेत पाटाकडीलच्या अक्षय मेथे-पाटीलच्या पासवर ओंकार जाधवने हेडद्वारे मारलेला चेंडू प्रॅक्‍टिसच्या गोलजाळीवरून गेला. प्रॅक्‍टिसच्या खेळाडूंनी पुन्हा चेंडूवर नियंत्रण ठेवत चढाया केल्या. त्यांच्या माणिक पाटीलला पाटाकडीलच्या गोलक्षेत्रातून गोल करण्याची संधी होती. चेंडूवर नियंत्रण ठेवण्यात तो कमी पडल्याने ही संधी फोल ठरली आणि प्रॅक्‍टिसचे समर्थक हळहळले.

पाटाकडीलच्या समर्थकांना प्रोत्साहन देण्यासाठी घोषणाबाजी सुरू झाली. त्यांच्या ओंकार पाटीलने प्रॅक्‍टिसच्या गोलक्षेत्राबाहेरून मारलेला चेंडू प्रॅक्‍टिसचा गोलरक्षक राजीव मिरियालने अडवला. ऋषीकेश मेथे-पाटीलची चढाई प्रॅक्‍टिसच्या अभिजित शिंदेने रोखली. कॉर्नर किकवर ऋषभ ढेरेने मारलेल्या चेंडूवर गोल करण्यात पाटाकडीलचे खेळाडू गोंधळले, तर ओंकार पाटीलने लगावलेला चेंडू प्रॅक्‍टिसच्या गोलजाळीवरून गेला. जादा चार मिनिटांत दोन्ही संघांचे खेळाडू इरेला पेटले; पण गोल झाला ऩाही.

Web Title: Kolhapur News KSA Football competition