पास्ट रोटरॅक्‍टर्स, प्रोफेशनल, मार्व्हलस, आर. सी. विजयी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

कोल्हापूर -  पास्ट रोटरॅक्‍टर्स, प्रोफेशनल चॅलेंजर्स, मार्व्हलस सुपर रेंजर्स व आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत मैदान गाजविले.

कोल्हापूर -  पास्ट रोटरॅक्‍टर्स, प्रोफेशनल चॅलेंजर्स, मार्व्हलस सुपर रेंजर्स व आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत मैदान गाजविले.

पास्ट रोटरॅक्‍टर्सच्या अमित दड्डीकरची भेदक गोलंदाजी, प्रोफेशनल चॅलेंजर्सच्या अनिल देशमुख याची अष्टपैलू खेळी, मार्व्हलस सुपर रेंजर्सच्या सचिन गाडगीळची तडाखेबाज फलंदाजी व आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सच्या धीरज पाटीलच्या उत्कृष्ट गोलंदाजीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. 

सकाळ माध्यम समूह व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित ‘सकाळ-रोटरी प्रीमिअर लीग’ चषक क्रिकेट स्पर्धेस मेरी वेदर मैदानावर आज सुरवात झाली. ऋतुराज पाटील फाउंडेशन स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. हॉटेल सिट्रस हॉस्पिटॅलिटी व डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय हे कॅप्स पार्टनर आहेत. रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर आहेत. 

पास्ट रोटरॅक्‍टर्सचा चाटे चॅम्प्सविरुद्ध सहज विजय
चाटे चॅम्प्सने १० षटकांत सात गडी गमावून ८८ धावा 
केल्या. सलामीचा फलंदाज जितेंद्र पार्टे व सचिन झंवर हे शून्यावर बाद झाल्यानंतर कर्णधार सागर महामुनीने सामन्याची सूत्रे हाती घेत २१ चेंडूंत २६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने तीन चौकार ठोकले. प्रमोद देसाईने तीन चेंडूंत पाच, हरीश पटेलने १२ चेंडूंत सहा धावा केल्या. 
प्रीतेश कर्नावटने आक्रमक फलंदाजी करताना १३ चेंडूंत ३१ धावा ठोकल्या. त्याने दोन षट्‌कार व तीन चौकार मारले. रामचंद्र पाटीलने सात व सत्यजित पाटीलने नाबाद दोन धावा केल्या. पास्ट रोटरॅक्‍टर्सकडून अमित दड्डीकरने दोन, तर नीलेश मुळे व अजित मडकेने प्रत्येकी 
एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल पास्ट रोटरॅक्‍टर्सने ८ षटकांतच चार गडी गमावून ९२ धावा फटकावून सामना जिंकला. अजित मडकेने १५ चेंडूंत १६ धावा केल्या. राजू करूरला अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. तो केवळ एक धाव करून बाद झाला. सचिन देशमुखने डाव सावरताना ११ चेंडूंत २४ धावा केल्या. त्याने दोन षट्‌कार व एक चौकार मारला. गोपाळ गवसने संघाला सामना जिंकून देण्यासाठी तुफानी टोलेबाजी केली. त्याने दहा चेंडूंत ३० धावा केल्या. त्यांत दोन षट्‌कार व तीन चौकारांचा समावेश होता. नीलेश मुळेने सात चेंडूंत १४ व प्रवीण काजवेने नाबाद चार धावा केल्या. चाटे चॅम्प्सकडून रामचंद्र पाटील, आर. वाय. पाटील, प्रमोद देसाई, प्रीतेश कर्नावट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

प्रोफेशनल चॅलेंजर्स एम.डब्ल्यू.जी. विरुद्ध ‘किंग’
प्रोफेशनल चॅलेंजर्सने १० षटकांत पाच गडी गमावून ९९ धावांचे आव्हान एम. डब्ल्यू. जी. सुपरकिंग्जसमोर ठेवले. त्यांचा सलामीचा फलंदाज व कर्णधार सचिन परांजपे याने १२ चेंडूंत २१ धावा केल्या. त्याने दोन षट्‌कार व एक चौकार ठोकला. जयजित परितकरने १० चेंडूंत १७ धावा केल्या. अनिल देशमुख याने २३ चेंडूंत ३१ धावा फटकावताना दोन षट्‌कार व दोन चौकार ठोकले. सागर फलारेने चार चेंडूंत ११, संतोष साखरेने आठ चेंडूंत सहा, राजेंद्र बाड चार, तर मयूर पटेलने नाबाद दोन धावा केल्या. एम. डब्ल्यू. जी. सुपरकिंग्जकडून रोहन सावंत, दाजिबा पाटील, समीर कोतवाल व निवास वाघमारे यांनी प्रत्येकी एक गडी तंबूत परतवला.  प्रत्युत्तरादाखल खेळताना एम. डब्ल्यू. जी. सुपरकिंग्जच्या फलंदाजांनी हे आव्हान पेलण्यासाठी शर्थ केली. एम. डब्ल्यू. जी. सुपरकिंग्जला १० षटकांत नऊ गडी गमावून ७९ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीचे फलंदाज नील पंडित-बावडेकर सहा चेंडूंत आठ धावा फटकावून धावबाद झाले. सूरज रायगांधीला पाच चेंडूंत दहा धावा करता आल्या. रोहन सावंत १६ चेंडूंत २३ धावा फटकावून बाद झाल्यानंतर भरवशाचा फलंदाज निवास वाघमारे १५ चेंडूंत २७ धावा करत बाद झाला. समीर कोतवाल तीन, दाजिबा पाटील दोन, सुधीर नाईक व सुमित बिरंजे शून्य धावेवर बाद झाले. संजय पाटीलने नाबाद दोन धावा केल्या. मात्र, त्यांना प्रोफेशनल चॅलेंजर्सचे आव्हान पार करता आले नाही. प्रोफेशनल चॅलेंजर्सकडून अनिल देशमुख यांनी फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीत कमाल करत दोन षटकांत केवळ तीन धावा देत चार गडी बाद केले. सचिन परांजपे, संतोष साखरे, राजेंद्र बाडने प्रत्येकी एक गडी बाद केले. 

एमआयडीसी वॉरियर्सकडून स्नॅप स्पेक्‍ट्रम पराभूत
स्नॅप स्पेक्‍ट्रमने १० षटकांत ८ गडी गमावून ६७ धावा केल्या. संजय कदमने २७ चेंडूंत ४० धावा केल्या. सहा चौकार व एका षट्‌काराच्या साह्याने त्याने या धावा ठोकल्या. राजेश आडकेने चार, गिरीश बारटक्केने तीन, कर्णधार शैलेश भोसलेने पाच धावा केल्या. भरवशाचा फलंदाज रवी मायदेवला भोपळाही फोडता आला नाही. मंजूनाथ सवन्नावरने आठ धावा केल्या. राहुल कुलकर्णी शून्यावर बाद झाला. विद्यानंद बेडेकरने नाबाद तीन, तर महेश अंगोडकरने दोन धावा केल्या. आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सकडून धीरज पाटीलने दोन षटकांत पाच धावा देत चार गडी बाद केले. सचिन पाटील व महादेव नरके यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सने ७ षट्‌के ४ चेंडूंत ६८ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांचे चार गडी बाद झाले. त्यांच्या धर्मेंद्र खिलारे व कर्णधार अजित जाधव यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्येला आकार दिला. धर्मेंद्रने २३ चेंडूंत नाबाद २७ तर अजितने १४ चेंडूंत १८ धावा केल्या. सचिन पाटील पाच चेंडूंत दहा, तर महादेव नरके दोन धावांवर बाद झाला. स्नॅप स्पेक्‍ट्रमकडून संजय कदम व गिरीश बारटक्केने प्रत्येकी एक गडी बाद केला. 

बेलगाम ट्रेंड सेटर्सविरुद्ध ‘मार्व्हलस’ विजयी
मार्व्हलस सुपर रेंजर्सने १० षट्‌कांत चार गडी गमावून ११६ धावांचे तगडे आव्हान बेलगाम ट्रेंड सेटर्ससमोर ठेवले. त्यांच्या कर्णधार रविराज शिंदेने १२ चेंडूंत १६ धावा केल्या. राजेश रेड्डीज केवळ एक धाव करून बाद झाला. स्वप्नील कांबळेने ११ चेंडूंत १० धावा फटकाविल्या. या वेळी मैदानात आलेल्या सचिन गाडगीळची बॅट तळपली 
आणि बेलगाम ट्रेंड सेटर्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. सचिनने अवघ्या २२ चेंडूंत नाबाद ६२ धावांची आक्रमक फलंदाजी केली. त्याने त्याने तब्बल सहा षट्‌कार, तर चार चौकार ठोकले. नागराज भट्टने सात चेंडूंत सात, तर नामदेव गुरवने पाच चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या. बेलगाम ट्रेंड सेटर्सकडून संजय साळोखे व नितीन शिंदेने प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल बेलगाम ट्रेंड सेटर्सला १० षटकांत ७९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांचे सात गडी बाद झाले. राहुल कुलकर्णीने दोन, कर्णधार नितीन शिंदेने १७ चेंडूंत १५, संग्रामसिंह सरनोबत आठ चेंडूंत १५, रवींद्र पावरा पाच, तर संजय साळोखे १४ धावांवर बाद झाला. अंकुश कारंडेला दोन, पंकज पोवार नाबाद सात, मनोज चावरेला दहा धावा करता आल्या. मार्व्हलस सुपर रेंजर्सकडून नामदेव गुरवने दोन षट्‌कांत आठ धावा देत चार गडी बाद केले. त्याच्या गोलंदाजीपुढे बेलगामचे फलंदाज निष्प्रभ ठरले. राजेश रेड्डीजने दोन, तर सचिन गाडगीळने एक गडी बाद केला. 

आर. सी. शिरोली एमआयडीसीचा निर्णायक विजय
तत्पूर्वी काल (ता. ४) रात्री झालेल्या सामन्यात चाटे चॅम्प्सने १० षटकांत तीन गडी गमावून ९९ धावा केल्या. जितेंद्र पार्टेने २२ चेंडूंत २९ धावा केल्या, तर सचिन झंवर आठ चेंडूंत आठ धावा काढून बाद झाला. कर्णधार सागर महामुनीने संघाच्या धावसंख्येला आकार देताना १९ चेंडूंत २८ धावा फटकाविल्या. त्यात चार चौकारांचा समावेश होता. प्रीतेश कर्नावटने ११ चेंडूंत २८ धावा केल्या. त्याने दोन षट्‌कार व दोन चौकार ठोकले. आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सकडून महादेव नरके, अमित सोनवणे व सचिन पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सने ९ षटके ५ चेंडूंत १०० धावा ठोकून सामना जिंकला. त्यांचा सलामीचा फलंदाज धर्मेंद्र खिलारे एक धावा काढून बाद झाला. सचिन पाटीलने २० चेंडूंत २६ धावा केल्या. मात्र, त्यानंतर अमित सोनवणे एक व महादेव नरके पाच धावांवर बाद झाल्याने चाटे चॅम्प्सचे पारडे जड झाले. चार मोहरे बाद झाल्यानंतर कर्णधार धीरज पाटील याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना २१ चेंडूंत ५१ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याचे चार षट्‌कार व तीन चौकार मारले. अजित जाधवने नाबाद सात धावा केल्या. चाटे चॅम्प्सकडून आर. वाय. पाटीलने दोन, तर रामचंद्र पाटील व सागर महामुनीने प्रत्येकी एक गडी तंबूत परतवला. 

Web Title: Kolhapur News RPL cricket competition