मरगाई गल्ली ते बर्मिंगहॅम व्हाया गांधी मैदान!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

अमेरिकेतील अलाबामा राज्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या बर्मिंगहॅममध्ये युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामामध्ये (यूएबी) शिक्षण घेत आहे...मरगाई गल्ली ते बर्मिंगहॅम व्हाया गांधी मैदान असा हा प्रेरणादायी प्रवास आहे, सर्वेश सुनील साळोखे याचा. 

कोल्हापूर - वडिलांची सरकारी नोकरी. त्यामुळे वारंवार बदल्या ठरलेल्या. साहजिकच त्याचं शिक्षण वेगवेगळ्या शाळेत झालं. कोल्हापुरात राहायला आल्यापासून मात्र त्यानं फुटबॉलचं वेड जपलं आणि आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर फुटबॉलचं हे वेडच त्याच्यासाठी धावून आलं. परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेण्याचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं आणि आता तो अमेरिकेतील अलाबामा राज्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या बर्मिंगहॅममध्ये युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामामध्ये (यूएबी) शिक्षण घेत आहे...मरगाई गल्ली ते बर्मिंगहॅम व्हाया गांधी मैदान असा हा प्रेरणादायी प्रवास आहे, सर्वेश सुनील साळोखे याचा. 

परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं सर्वेशच स्वप्न पूर्ण झालं असलं तरी त्यामागे त्याच्या आत्मविश्‍वासाबरोबरच घेतलेल्या कठोर मेहनतीचीही झालर आहे. आवश्‍यक प्रवेश परीक्षा आणि इतर कोर्सेससाठी तो दररोज एसटीने साताऱ्याला ये-जा करायचा. व्हिसा काढण्यासाठीही त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. पण, तो डगमगला नाही. कारण गांधी मैदानात तो फुटबॉल खेळायला शिकला आणि तेथील जिगर घेऊनच तो प्रत्येक गोष्टीला सामोरे गेला. आजोबा (कै.) बाळासाहेब साळोखे यांचं प्रोत्साहन त्याला होतेच. पण, त्याशिवाय घरच्यांनीही त्याला खमका पाठिंबा दिला.

गल्लीत शाळेबरोबर आणखी काय करतोस, असा प्रश्‍न विचारला जायचा. मग, मी गांधी मैदानात फुटबॉल खेळायला जाऊ लागलो आणि हा खेळ माझा श्‍वासच होऊन गेला. त्याच जोरावर मी शिक्षणाचे स्वप्नही पूर्ण करू शकलो.
- सर्वेश साळोखे

‘यूएबी’मध्ये तो ‘मास्टर्स इन इंजिनिअरिंग डिझाईन अँड कमर्शिअलायझेशन’ कोर्समध्ये यश मिळवताना ग्रॅज्युएट टिचींग असिस्टंट म्हणून काम केलं. या दरम्यान, ईजीआर-६०२ या कोर्ससाठी ३२ अमेरिकन आणि जगभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध प्रोजेक्‍टही त्यानं पूर्ण केले. ‘यूएबी’च्या फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणूनही तो यशस्वी ठरला आहे. सध्या तो शिक्षण घेत इनोव्हेशनला प्राधान्य देणाऱ्या कंपन्यात कामासाठी अर्ज करतो आहे. 

अर्थात या साऱ्या प्रवासात त्याने सुरवातीच्या काळात बर्मिंगहॅममध्ये राहायला जागा मिळण्यासाठी त्याने तेथील भारतीयांच्या घरात धुण्या-भांड्याची कामंही केली आणि मदत मागायला व करायला कधीही लाजायचे नसते, ही गल्लीतली शिकवण प्रत्येक वळणावर प्रेरणा देणारी ठरल्याचे सर्वेश सांगतो. दरम्याना, त्याला ‘यूएबी’मध्ये प्रवेश मिळण्यासाठी स्वाती तारळेकर, अभय केळकर यांचे मार्गदर्शन मिळाले. 

Web Title: Kolhapur News Sarvesh Salokhe success story