स्वप्नील कदम बनला ‘टेक्‍नो स्कोअरर’

स्वप्नील कदम बनला ‘टेक्‍नो स्कोअरर’

कोल्हापूर - तुम्ही गोलंदाज असा की फलंदाज. तुमची चूक तुम्हाला कळतच नसेल, तर तुम्ही चांगले क्रिकेटपटू कसे होणार? क्रिकेट स्कोअरर स्वप्नील रमेश कदम याच्याकडे मात्र या चुका दुरुस्त करण्याचा जबरदस्त ‘फॉर्म्युला’ आहे. व्हिडिओ ॲनॅलेसिसमधून त्याने अनेक खेळाडूंना तंत्रशुद्ध क्रिकेटच्या टिप्स दिल्या असून, हजारांहून अधिक क्रिकेट सामन्यांचे स्कोअरर म्हणून कामही केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातला तो एकमेव ‘टेक्‍नो स्कोअरर’ असून, त्याच्या स्मार्ट कामामुळे कोल्हापूरच्या क्रिकेट विश्‍वाला नवा आयाम मिळाला आहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रमेश कदम यांचा स्वप्नील हा मुलगा. तो शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागात एमएच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. वडिलांकडून क्रिकेटचे बाळकडू मिळाल्याने तो क्रिकेटमध्येच रमला आहे. त्याची शिवाजी विद्यापीठाच्या संघातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

चुका दुरुस्त करण्यास शिका
स्वप्नील म्हणतो, ‘‘भारतीय महिला संघातील अनघा देशपांडे, स्मृती मानधना, स्नेहल प्रधान, अनुजा पाटील, सोनिया डबीर, देविका वैद्य यांच्यासह कोल्हापुरात झालेल्या प्रतिमा वुमेन क्रिकेट लीग स्पर्धेतून स्वागतिका राहात, सोनी यादव, प्रीती बोस, रिमा मल्होत्रा यांचा खेळ पाहण्याचा योग आला. त्यातून त्यांचे खेळातील तंत्र समजावून घेता आले. एखाद्या क्रिकेटपटूला क्रिकेटमधील करिअर करायचे असेल, तर त्याने प्रथम आपल्या चुका समजावून घेत त्या दुरुस्त करण्यास शिकायला हवे.’’

विशेष म्हणजे त्याने २००६-०७ला रणजी ट्रॉफी स्कोअरर जयंत गोखले यांच्या कोल्हापुरातील स्कोअरर शिबिरात सहभाग घेत स्कोअरिंग करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर निमंत्रितांच्या १४, १६, १९ वर्षांखालील व खुल्या गटातील क्रिकेट सामन्यांसह सांगली वुमेन्स प्रीमियर लीग, टाटा ग्रुप, प्रतिमा वुमेन लीग, आरपीएल क्रिकेट स्पर्धेतही स्कोअरर म्हणून काम केले आहे. 

बीसीसीआयच्या गेम डेव्हलपमेंट कमिटीचे व्यवस्थापक स्टॅन्ले सालढाणा यांनी तयार केलेले स्मार्ट कोच सॉफ्टवेअर तो स्कोअरिंगसाठी वापरतो. हे सॉफ्टवेअर असणारा तो कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आहे. सॉफ्टवेअरमुळे ऑनलाईन स्कोअरिंग करण्यात सुलभता आली आहे. विशेष म्हणजे फलंदाज व गोलंदाजाचे कौशल्य, सर्वाधिक षटकार, चौकार, झेल, धावांची गती अशा विविध अंगांनी सामन्याचे विश्‍लेषण करणे सोपे झाले आहे. तो क्रिक हिरो ॲपवर ऑनलाईन स्कोअरिंगही करतो. हातात पेन घेऊन कागदावर स्कोअर लिहिण्याच्या कटकटीला सॉफ्टवेअरमुळे पूर्णविराम 
मिळाला आहे. 

फलंदाज, गोलंदाजांचे व्हिडिओ ॲनॅलेसिसही तो करतो. त्याने १६ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य संघातील सिद्धांत जोशी, बीसीसीआयचा वेस्ट झोनकडून खेळलेला खेळाडू वैभव पाटील, भारतीय महिला क्रिकेट संघातील अनुजा पाटील, रणजी खेळाडू संग्राम अतितकर, १६ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य संघातील इस्माईल तांबे, महाराष्ट्र व बडोदा संघाकडून रणजी खेळलेली स्नेहा जामसांडेकर व २३ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य संघातील समीर खोडवे यांचे व्हिडिओ ॲनेलिसिस करत त्यांच्या चुका शोधत त्या सुधारण्याच्या टिप्सही दिल्या आहेत. 
मुंबई रणजी संघाचे सौरभ वालकर, कर्नाटकचे किरण कुरतडकर, विदर्भचे अनिरुद्ध देशपांडे, भारतीय महिला संघाचे आशुतोष हे वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असल्याचेही तो आवर्जून सांगतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com