‘प्रॅक्‍टिस’चा शांततादूत उदय वास्कर

संदीप खांडेकर
सोमवार, 1 जानेवारी 2018

. ‘प्रॅक्‍टिस’चा सामना कोठेही असो, संघाबरोबर त्यांची सैर ठरलेलीच असते. संघ जिंकला की जल्लोष आणि हरला की त्यांची झोप उडते. प्रॅक्‍टिसचे कट्टर समर्थक म्हणूनच त्यांची ओळख दृढ झाली असून, मैदानावर ‘शांततादूत’ म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.  

कोल्हापूर - सकाळी साडेसहाला उदय वास्कर हातात तीन-चार फुटबॉल घेऊन मैदानावर दररोज हजर असतात. फुटबॉल घेऊन त्यांनी कधी सराव केलाय किंवा ते संघाकडून खेळलेत, असे कधीच घडले नाही. पांढरा-निळा म्हटले, की मात्र त्यांचे रक्‍त सळसळते. ‘प्रॅक्‍टिस’चा सामना कोठेही असो, संघाबरोबर त्यांची सैर ठरलेलीच असते. संघ जिंकला की जल्लोष आणि हरला की त्यांची झोप उडते. प्रॅक्‍टिसचे कट्टर समर्थक म्हणूनच त्यांची ओळख दृढ झाली असून, मैदानावर ‘शांततादूत’ म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.  

एखाद्या संघावर प्रेम कसे करावे, हे इथल्या फुटबॉलप्रेमींकडून शिकण्यासारखे आहे. त्यापैकीच एक वास्कर आहेत. सुबराव गवळी तालीम परिसरात ते राहतात. त्यांचे आजोबा पांडुरंग परशुराम मोहिते हे मूळचे वंदूर (ता. कागल) गावचे.

माझे वडील मल्ल होते. ते कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्‍वर तालीम परिसरातले. त्यांना कुस्तीची, तर मला फुटबॉलची आवड. आजोबांनी क्‍लबची सेवा केली तीच माझ्याकडून होत आहे. या सेवेतून मला आनंद मिळत आहे.
- उदय वास्कर.

व्यवसायानिमित्त कोल्हापुरात सुबराव गवळी तालीम परिसरात स्थायिक झाले. येथेच त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले. फुटबॉलवर त्यांचे विशेष प्रेम असल्याने प्रॅक्‍टिस क्‍लबशी त्यांचे नाते घट्ट झाले. प्रॅक्‍टिस क्‍लबचा सामना झाला, की खेळाडूंचे किट गोळा करून ते सावंतांच्या विहिरीवर धुण्यासाठी नेत आणि सामन्यावेळी ते प्रत्येकाला परत द्यायचे. प्रॅक्‍टिसची ही आगळीवेगळी सेवा करण्यात त्यांना समाधान मिळायचे. त्यांचा नातू उदय विजय वास्कर याने त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. 
श्री. वास्कर यांचे प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच ते प्रॅक्‍टिस क्‍लबशी एकरूप झाले. प्रॅक्‍टिसचा सामना म्हटले, की ते मैदानावर आवर्जून हजर असतात.

सकाळी प्रॅक्‍टिसचे खेळाडू मैदानावर सरावाला येणाऱ्यापूर्वी ते मैदानावर चेंडू घेऊन हजर असतात. सरावाला किती खेळाडू येतात, त्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम ते करतात. प्रॅक्‍टिसचा सामना बेळगाव, गडहिंग्लज किंवा मिरजेला असो, ते स्वखर्चाने सामना पाहण्यासाठी जातात. प्रॅक्‍टिस संघाविरुद्ध कितीही तुल्यबळ संघ असो, त्यांचे सूत्र मात्र ‘प्रॅक्‍टिस एके प्रॅक्‍टिस’ हेच राहिले आहे. विशेष म्हणजे सामना कितीही तणावपूर्ण असो अथवा प्रसंगी मारामारी अथवा हुल्लडबाजीचा प्रकार सुरू होवो, समर्थकांना शांत करण्यासाठी ते शांततादूत म्हणून पुढे येतात. वास्कर यांना चार मुली. त्यापैकी तीन मुली विवाहित असून, चौथी मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले; मात्र त्यातून स्वत:ला सावरत ते क्‍लबशी आजही एकनिष्ठ राहून काम करत आहेत.

Web Title: Kolhapur news Uday waskar special story