खेळाडूंनाे जिद्दीने खेळा, विजय तुमचाच : श्वेता सिंघल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 November 2019

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात रविवारपासून 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला.

सातारा ः राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार होत असून, राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने खेळावे विजय तुमचाच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आज 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी क्रीडा ध्वज फडकावून उदघाटन केले. यावेळी सर्व खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली.

कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत साखरे, माजी नगरसेवक तुषार पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलनकर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश चव्हाण, आर. वाय. जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुजीत शेडगे, विक्रांत दाभाडे, आदित्य अहिरे, सातारा जिल्हा ऍथसेटिक्‍स संघटनेचे सचिव संजय वाटेगावकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, ""चार दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा विभागाने उत्तम नियोजन केले आहे. या स्पर्धा चांगल्या व निकोप वातावरणात पार पडतील. या स्पर्धेत उत्साहाने खेळा मनापासून जिंकण्याचा प्रयत्न करा.''

प्रयत्न करत रहा, यश नक्की प्राप्त होईल : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही मनोगत व्यक्त केले. सातपुते म्हणाल्या, ""राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा साताऱ्यात होत आहे, ही आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशातील बऱ्याच खेळाडूंनी अनेक अडचणींवर मात करुन राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठवून स्पर्धकांनी आपली भावी वाटचाल करावी.'' राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता स्पर्धेतील सहभागी खेळाडूंमध्ये आहे. प्रयत्न करत रहा एकना एक दिवस यश नक्की प्राप्त होईल, असा विश्वासही सातपुते यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता राज्याचा संघ निवडला जाणार

जिल्हा क्रीडाधिकारी युवराजन नाईक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ""राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत यजमान कोल्हापूर विभागासह, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, क्रीडापीठ या नऊ विभागातील दोन हजार 106 खेळाडू, संघव्यवस्थापकांचा सहभाग आहे. या क्रीडा स्पर्धेमधून पंजाब येथे होणाऱ्या 65 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचा प्रातिनिधीक संघ निवडला जाणार आहे.''

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Play The Games Stubbornly, Victory Is Yours Says Shweta Singhal