विद्यापीठ स्तरावर रग्बी, शालेय स्‍पर्धांना ठेंगाच!

संदीप खांडेकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - शालेय क्रीडा स्पर्धेतून रग्बी खेळ वगळल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्रेसष्टाव्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांचे संघ खेळले तरी सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. शिवाजी विद्यापीठ स्तरावर रग्बी असताना शालेय स्तरावर नाही, अशी स्थिती आहे.

कोल्हापूर - शालेय क्रीडा स्पर्धेतून रग्बी खेळ वगळल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्रेसष्टाव्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांचे संघ खेळले तरी सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. शिवाजी विद्यापीठ स्तरावर रग्बी असताना शालेय स्तरावर नाही, अशी स्थिती आहे. ऑलिंपिकमध्ये रग्बीचा समावेश असताना शालेय स्पर्धेतून खेळ वगळण्याचा निर्णय कशासाठी? हाच प्रश्‍न आहे. 

शालेय क्रीडा स्पर्धेत एकूण ४२ क्रीडा प्रकार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दोन वर्षांपूवी शालेय क्रीडा स्पर्धेत रग्बी प्रकारात सुमारे पन्नास संघ सहभागी झाले होते. प्रायोगिक तत्त्वावर खेळाचा समावेश केला असला, तरी ही संख्या सरकारला विचार करायला लावणारी होती.  जिल्हा रग्बी असोसिएशनची स्थापना २०१५-१६ला झाल्यानंतर जिल्ह्यात खेळाचा वेगाने झालेल्या प्रसाराचा तो परिपाक होता. 

शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या रग्बीकडे ग्रामीण भागातील खेळाडू मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले. पृथ्वीराज पाटील (कोपार्डे) व श्रीधर निगडे (नागदेववाडी) यांनी शालेय रग्बी स्पर्धेतून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. नीलम पाटील (धामणी) एशियन स्पर्धेत खेळली. आजपर्यंत जिल्ह्यातील पन्नास खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत.  

शालेय स्पर्धेतून खेळ वगळला असला, तरी कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशनतर्फे रग्बी स्पर्धेचे आयोजन केले जाते. १४, १७ व १९ वर्षाखालील वरिष्ठ गट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने दबदबा निर्माण केला आहे. खेळाडूंच्या नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण असलेल्या खेळांत रग्बीचा समावेश आहे. याचाच अर्थ शालेय स्पर्धेत हा खेळ नसल्याने मुला-मुलींच्या संघातील खेळाडूंचे नुकसान होते. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेतून मिळणाऱ्या फायद्यापासून खेळाडू वंचित राहतात. त्रेसष्टाव्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र वगळता उत्तर प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगण, पंजाब, ओडिशा राज्यांचे संघ सहभागी झाले. यंदा चौसष्टावी १४, १७ व १९ वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा भुवनेश्‍वर (ओडिशा) येथे होत आहे. मात्र महाराष्ट्राचा संघ स्पर्धेत नसणार, हे दुर्दैवी असल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. 

कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशनची स्थापना - २०१५-१६
कार्यकारिणी अशी : अध्यक्ष - अध्यक्ष प्रा. अमर सासने, उपाध्यक्ष - नरेंद्र खाडे, प्रशिक्षक व सचिव - दीपक पाटील, खजिनदार - सुदेश सूर्यवंशी

Web Title: Rugby game dropped out of school sports competition