एका ‘क्‍लिक’वर समजणार ‘कबड्डी’विषयी सारे काही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

कबड्डीसाठी वाहून घेतलेल्या भावसार यांनी ‘कबड्डी युनिव्हर्स’  संकेतस्थळ अथक परिश्रमानंतर बनवले. एका ‘क्‍लिक’वर कबड्डीतील कोणतीही माहिती उपलब्ध होणार आहे. कबड्डीचे जगातील पहिले संकेतस्थळ बनले आहे.

सांगली - कबड्डीनगरी... सांगलीची आणखी एक ओळख म्हणावी लागेल. हुतूतूपासून ते कबड्डीपर्यंत सांगलीने राज्यात नव्हे तर देशात दबदबा निर्माण केला. कबड्डीतून जिल्ह्याला केंद्राचा पहिला अर्जुन पुरस्कार सांगलीचे श्रीराम ऊर्फ राजू भावसार यांनी मिळवून दिला. कबड्डीसाठी वाहून घेतलेल्या भावसार यांनी ‘कबड्डी युनिव्हर्स’  संकेतस्थळ अथक परिश्रमानंतर बनवले. एका ‘क्‍लिक’वर कबड्डीतील कोणतीही माहिती उपलब्ध होणार आहे. कबड्डीचे जगातील पहिले संकेतस्थळ बनले आहे.

कबड्डीला आलेली मरगळ प्रो-कबड्डीमुळे दूर झाली. ग्रामीण भागात पुन्हा ‘ले पंगा’चा नारा सुरू झाला आहे. सांगलीचे काशिलिंग आडके आणि नितीन मदने देश देशाबाहेरही प्रकाशझोतात आले. कबड्डीसाठी हा सुकाळच म्हणावा लागेल. सांगलीला कबड्डीनगरी म्हणून देशभरात लौकिक मिळवून देण्यात अनेकांचा वाटा आहे. कबड्डीतून अनेक खेळाडू इथल्या मातीत घडले. आता मॅटवरही सांगलीकरांनी तोच दबदबा कायम ठेवला. याच कबड्डीनगरीतील खेळाडू भावसार यांनी देशात लौकिक मिळवला. त्यामुळेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित झाले. ‘राजू भावसार फौंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून आजही ते कार्यरत आहेत. ४० वर्षे कबड्डीच्या मैदानावर कार्यरत भावसार कबड्डीपटूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण, शालेय शिक्षकांसाठी ‘ट्रेन द ट्रेनर्स’ असे उपक्रम राबवताहेत. मुंबई महापालिकेच्या १८ शाळांतील मुला-मुलींना फौंडेशनमार्फत प्रशिक्षण दिले जाते. 

सांगलीतही नववर्षात लठ्ठे एज्युकेशन संस्थेच्या सांगली, कोल्हापूरातील शाळा, महाविद्यालयात कबड्डीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीय कबड्डीपटू व प्रो-कबड्डीतील खेळाडूंसाठी शिबीराचेही आयोजन केले जाते. कबड्डीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी भावसार यांनी कबड्डीसाठी ‘कबड्डी युनिव्हर्स’ हे पहिले संकेतस्थळ सुरू केलेय. नववर्षात एक जानेवारीला हैद्राबाद येथे सुरू होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांच्या हस्ते अनावरण होत आहे. 

कबड्डीतील सर्व काही माहिती संकेतस्थळावर आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अपडेटस्‌ असतील. देशातील खासगी कबड्डी संघ, व्यवसायिक संघाची जिल्हा व राज्यनिहाय माहिती असेल. कबड्डीच्या नविन प्रेक्षकासाठी नियमांचे व कौशल्यांचे प्रात्यक्षिकांसह चित्रीकरणाद्वारे स्पष्टीकरण असेल. खेळाडूंचे शंका निरसन तज्ञांद्वारे केले जाईल. खेळाडूंच्या मुलाखती असतील. आवडीच्या खेळाडूंशी संवादही साधता येईल. 

Web Title: Sangli News Kabbadi Universe website