भारत - ऑस्ट्रेलिया सामना 23 फेब्रुवारीला पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मुंबई: पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पुण्यातील गहुंजे स्टेडियमवरील कसोटी क्रिकेट सामन्याने ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यास सुरवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (शुक्रवार) जाहीर केले. 23 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामने होतील. 

या दौऱ्यातील पहिली कसोटी पुण्यात 23 फेब्रुवरीपासून होणार आहे. त्यानंतर बंगळूर, रांची आणि धरमशाला येथे कसोटी होतील. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी या ठिकाणांची घोषणा 'बीसीसीआय'ने यापूर्वीच केली होती; पण त्या सामन्यांची तारीख आज जाहीर केली. 
यापूर्वी 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी भारताने 4-0 असे 'धवल यश' मिळविले होते. त्यानंतर 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेमध्ये यजमानांनी 2-0 असा विजय मिळवित पुन्हा बॉर्डर-गावसकर करंडक मिळविला होता. याच मालिकेदरम्यान महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी भारत इंग्लंडविरुद्धची मालिका खेळणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका होईल. त्यानंतर नाताळच्या सुटीसाठी इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतणार आहेत. या सुटीनंतर जानेवारीत इंग्लंड आणि भारतामध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. 

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील कसोटींचे वेळापत्रक: 

  • 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी : पहिली कसोटी, पुणे 
  • 4 मार्च ते 8 मार्च : दुसरी कसोटी, बंगळूर 
  • 16 मार्च ते 20 मार्च : रांची 
  • 24 मार्च ते 28 मार्च : धरमशाला 
Web Title: Pune's Gahunje stadium will witness India vs Australia