विराट कथानायकाची अफाट कथा (बुकशेल्फ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

कथा सांगणे ही एक कला असते आणि ती खुलवून सांगणे हा कौशल्याचा भाग असतो. त्यासाठी कथाकाराचे कसब महत्त्वाचे असतेच; पण मुळात कथानायक दमदार असेल, तर मग कथाकारालाही स्फुरण चढते. त्यातच हा नायक विराट कोहली असेल, तर मग ती कथा अमाप औत्सुक्‍य निर्माण करणे स्वाभाविक ठरते. दिल्लीस्थित क्रिकेट पत्रकार विजय लोकापल्ली यांच्या ताज्या पुस्तकाबाबत नेमके तेच घडले आहे. जगातील प्रत्येक कसोटी मैदानावर जाऊन वार्तांकन केलेले आणि समकालीन व्यवसायबंधूंमध्ये सर्वाधिक क्रिकेट कळणारे लोकापल्ली हेच ही कथा सांगण्यास योग्य व्यक्ती आहेत, असे रवी शास्त्री यांच्यासारखे परखड समालोचक नमूद करतात तेव्हाच अपेक्षा उंचावतात.

कथा सांगणे ही एक कला असते आणि ती खुलवून सांगणे हा कौशल्याचा भाग असतो. त्यासाठी कथाकाराचे कसब महत्त्वाचे असतेच; पण मुळात कथानायक दमदार असेल, तर मग कथाकारालाही स्फुरण चढते. त्यातच हा नायक विराट कोहली असेल, तर मग ती कथा अमाप औत्सुक्‍य निर्माण करणे स्वाभाविक ठरते. दिल्लीस्थित क्रिकेट पत्रकार विजय लोकापल्ली यांच्या ताज्या पुस्तकाबाबत नेमके तेच घडले आहे. जगातील प्रत्येक कसोटी मैदानावर जाऊन वार्तांकन केलेले आणि समकालीन व्यवसायबंधूंमध्ये सर्वाधिक क्रिकेट कळणारे लोकापल्ली हेच ही कथा सांगण्यास योग्य व्यक्ती आहेत, असे रवी शास्त्री यांच्यासारखे परखड समालोचक नमूद करतात तेव्हाच अपेक्षा उंचावतात. लोकापल्ली यांनी वेळोवेळी विविध पातळ्यांवर विराटला पाहिलेल्या, त्याच्या प्रतिभेला पैलू पाडलेल्या, त्याच्या प्रगतीचे साक्षीदार असलेल्या बहुतेक सर्व पात्रांशी संवाद साधला आहे. वेळोवेळी त्यांचे संदर्भ देत ही कथा ते पुढे नेतात. एक व्यक्ती म्हणून विराटच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडले. तरुणपणी स्वाभाविकच त्याची प्रतिमा भडक असली आणि तो कडक लढवय्या असला तरी एक व्यक्ती म्हणून त्याच्यावरील संस्कार किती चांगले आहेत, याचे काही भावपूर्ण प्रसंग लोकापल्ली यांनी डोळ्यासमोर उभे केले आहेत.

वडील प्रेम कोहली यांच्या आकस्मिक निधनानंतर विराट दुसऱ्या दिवशी मैदानावर गेला आणि रणजी सामन्यात कर्नाटकविरुद्ध खेळला. इतक्‍या कमी वयात त्याने दाखविलेले असामान्य धैर्य, त्याविषयी सहकारी व प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या प्रतिक्रिया वाचताना भावनावेग तीव्र होतो.
असाच आणखी एक प्रसंग आहे. शिक्षकदिनी प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या घरी त्याने भावाला पाठविले. भल्या सकाळी विराटचा भाऊ दारात पाहून चकित झालेल्या राजकुमार यांना मोबाईलवर विराटचा फोन येतो आणि तो शुभेच्छा देताना त्याचा भाऊ हातात कारची चावी ठेवतो.
दिल्ली क्रिकेटमध्ये प्रशासनाच्या पातळीवर दलदलच आहे. अशावेळी वयोगट पातळीवर पहिल्याच वर्षी अन्याय होऊन डावलला गेलेला, नंतर संधी मिळताच सोने केलेला, वयाच्या मानाने जास्त परिपक्वता आणि क्षमता प्रदर्शित करणारा, नेटमध्ये कसून घाम गाळणारा विराट राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कसा घडला, हे वाचणे आता उद्‌बोधक ठरते. विराट लहानपणीच त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांविरुद्ध खेळायचा. राजकुमार यांनी त्याच्या गुणवत्तेला शिस्तीची जोड कशी दिली, याचे संदर्भ उदयोन्मुख क्रीडापटूंना मार्गदर्शक ठरतील.

लोकापल्ली यांनी तेंडुलकर, सेहवाग यांच्यासह व्हीव रिचर्डस, सुनील गावसकर या आधीच्या पिढीतील दिग्गजांसह विराटची तुलना करीत त्याची वैशिष्ट्ये उलगडून सांगितली आहेत. सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीची तिन्हीसांज झाली असताना विराटचा उदय झाला आणि भारतीय क्रिकेटमधील हे स्थित्यंतरही यातून दिसून येते. कारकिर्दीच्या प्रारंभापासून विराटने पैशाचा मोह टाळला. विश्वकरंडक युवक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी एजंटांपासून दूर राहणारा विराट त्याच्यावरील संस्कार अधोरेखित करतो. हाच विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रतिस्पर्ध्यांसह अखिलाडू प्रेक्षकांनाही पुरुन उरतो. त्यांना प्रत्युत्तर देण्यामागील भूमिका नेमकी काय होती, यावर विराटने केलेले भाष्य त्याच्यातील तीव्र लढवय्या दाखविते. 2015 च्या विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर मैत्रीण अनुष्का शर्मावर झालेल्या टीकेबद्दल विराटने संयमाने केलेले भाष्यही त्याचा वेगळा पैलू दाखविते.
हाच विराट कर्णधार बनण्यापर्यंत कशी वाटचाल करतो हे वाचायला मिळते. दिल्लीच्या संघात विराटला स्थान मिळण्यासाठी पुढाकार घेतलेल्या अतुल वासन, हरी गिडवानी यांच्यासह राष्ट्रीय निवड समितीमधील सुरेंद्र भावे यांच्याशिवाय बिशनसिंग बेदी, कपिल देव असे दिग्गज विराटविषयी भरभरून बोलतात. विराटच्या कारकिर्दीचा अद्याप मध्यंतरही झालेला नाही; पण तो भारतीय क्रिकेटचा नायक बनला आहे. याशिवाय जागतिक क्रिकेटमध्ये त्याने सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

पुस्तकाचे नाव - DRIVEN The VIRAT KOHLI Story,

लेखक विजय लोकापल्ली, ब्लुम्सबरी पब्लिशिंग इंडिया.
पाने 221, किंमत 399 रुपये
मुकुंद पोतदार

Web Title: bookshelf virat kohli story