डेव्हिस करंडक; बलाढ्य उझबेकिस्तानचे भारतासमोर तगडे आव्हान

डेव्हिस करंडक; बलाढ्य उझबेकिस्तानचे भारतासमोर तगडे आव्हान

बंगळूर - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेत जागतिक गटात प्रवेश मिळविण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या प्ले-ऑफ लढतीत भारतासमोर बलाढ्य उझबेकिस्तानचे तगडे आव्हान राहील. ही लढत 7 ते 9 एप्रिलदरम्यान केएसएलटीएच्या मैदानावर होणार आहे.

एटीपी क्रमवारीत 69व्या स्थानावर असणारा डेनिस इस्टोमिन हा उझबेकिस्तानची खरी ताकद असेल. त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याचे आव्हान संपुष्टात आणले होते. संजर फाईझीव, तेमुर इस्माईलोव आणि फारुख डुस्टोव हे उझबेकिस्तान संघातील अन्य खेळाडू असतील.

या लढतीसाठी प्रथमच महेश भूपती भारतीय संघाचा कर्णधार असेल. भारतीय टेनिस संघटनेने या लढतीसाठी भारताचा संघ निवडला असला, तरी अंतिम चार जणांचा संघ निवडण्याचे अधिकार त्यांनी कर्णधार महेश भूपती यांना दिले आहेत. रोहन बोपण्णा, लिअँडर पेस, युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन असा अंतिम संघ अपेक्षित असला, तरी भूपती यांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही.

उझबेकिस्तानची ताकद लक्षात घेता भारताला तीन दिवसांच्या लढतीत पहिल्या दोन दिवसांत दुसरा एकेरीचा आणि नंतर दुहेरीचा सामना जिंकणे आवश्‍यक आहे. मात्र, भारताची अजून दुहेरीची जोडीच निश्‍चित झालेली नाही.

या लढतीसाठी कर्नाटक सरकारने कर्नाटक लॉन टेनिस राज्य संघटनेला 1 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनेच्या सूचनेनुसार या लढतीसाठी कोर्ट तयार केले जात असल्याचे संयोजक आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक सुनील यजमान यांनी सांगितले. सामने प्रकाशझोतात खेळविण्यात येणार असून दुपारी तीन वाजता सामने सुरू होतील. या लढतीसाठी ऑस्ट्रेलियाचे वेन मॅककेवेन निरीक्षक असतील, तर स्पेनचे नाचो फोर्साडेल आणि इराणचे अदेल बोरघेई हे दोघे चेअर अंपायर असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com