esakal | जोकोविच, मरेचा धडाका

बोलून बातमी शोधा

जोकोविच, मरेचा धडाका
जोकोविच, मरेचा धडाका
sakal_logo
By
पीटीआय

पॅरिस - अव्वल मानांकित अँडी मरे, द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच यांच्यासह जपानच्या जिगरबाज केई निशिकोरी यांनी यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. 

चौथ्या फेरीत विजयासाठी मरेला फारसे कष्ट पडले नाहीत. त्याने रशियाच्या कॅरेन खाचानोव याचे आव्हान ६-३, ६-४, ६-४ असे सहज संपुष्टात आणले. मरेने या लढतीत एकच टाळता येणारी चूक केली. पहिल्या सेटमध्ये केलेल्या या चुकीमुळे त्याला सर्व्हिस गमवावी लागली; पण लगेचच खाचानोव याची सर्व्हिस भेदण्याची संधी साधत त्याने लढतीवरील नियंत्रण राखले. मरेने सातव्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. 

त्याची गाठ आता जपानच्या जिगरबाज केई निशिकोरीशी पडणार आहे. त्याने चौथ्या फेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत स्पेनच्या फर्नांडो व्हेर्डास्को याचे आव्हान ०-६, ६-४, ६-४, ६-० असे संपुष्टात आणले.

गतविजेत्या नोव्हाक जोकोविच याने क्‍ले-कोर्टवरील विशेषज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या अल्बर्टो रामोस विनोलास याचा ७-६(७-५), ६-१, ६-३ असा पराभव केला.

जोकोविचने या विजयाने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत एकेरीतील जिमी कॉनर्स यांच्या २३३ विजयाच्या कामगिरीशी बरोबरी केली. सर्वाधिक ३१४ विजय रॉजर फेडररच्या नावावर आहेत. जोकोविचची गाठ आता ऑस्ट्रियाच्या सहाव्या मानांकित डॉमिनिक थिएमशी पडणार आहे. या दोघांमध्ये गेल्यावर्षी उपांत्य फेरीची लढत रंगली होती. 

महिला एकेरीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित सिमोना हालेप हिने झटपट विजय मिळवत आपली आगेकूच कायम राखली. तिने स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारो हिचे आव्हान ६-१, ६-१ असे संपुष्टात आणले. रुमानियाच्या सिमोनाने सहा लढतीत कार्लाविरुद्ध पहिलाच विजय मिळविला. तिची गाठ आता एलिना स्विटोलिना हिच्याशी पडणार आहे. तिने पात्रता फेरीतून आलेल्या पेट्रा मार्टिच हिचा ४-६, ६-३, ७-५ असा पराभव केला.