esakal | डेव्हिस करंडकातून पेसला वगळले

बोलून बातमी शोधा

डेव्हिस करंडकातून पेसला वगळले
डेव्हिस करंडकातून पेसला वगळले
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दुहेरीसाठी कर्णधार भूपतीची रोहन बोपण्णाला पसंती
बंगळूर - भारताचा अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेस याचा डेव्हिस करंडक स्पर्धेतील 27 वर्षांचा प्रवास आज थांबला. उझबेकिस्तानविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या आशिया-आशियाना गटातील लढतीसाठी कर्णधार महेश भूपती याने दुहेरीसाठी रोहन बोपण्णाला पसंती दिली.

या लढतीसाठी प्रथमच भारताचे नेतृत्व करणारा महेश भूपती याने तीन एकेरीच्या खेळाडूंची निवड केली. दुहेरीत त्याने बोपण्णाची मोट नवोदित श्रीराम बालाजीसोबत बांधली. रामकुमार रामानाथन आणि प्रज्ञेश गुणेश्‍वरन एकेरीच्या लढती खेळणार आहेत. युकीच्या गैरहजेरीत आता भारताच्या आशा रामकुमारवर अधिक असतील.

निर्णय कठीण होता
जवळपास तीन दशके भारतीय संघाकडून खेळणाऱ्या पेसला वगळण्याचा निर्णय कठीण होता, असे भूपतीने सांगितले. तो म्हणाला, 'दुहेरीत कुणाला खेळवायचे हा प्रश्‍न खरंच खूप कठीण होता. त्यामुळेच निर्णय घेण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत थांबलो. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यापासून एकेरीचे तीन खेळाडू खेळवायचे हे नक्की केले होते.

यातील दोन खेळाडू डेव्हिस करंडक स्पर्धेत पदार्पण करणार आहेत. त्यामुळे दुहेरीसाठी तज्ज्ञ जोडी खेळवणे मला धोक्‍याचे वाटले.''

पेसला वगळण्याचे समर्थन करताना भूपतीने अन्य खेळाडूंनी त्याच्यापेक्षा अधिक सराव केल्याचेही कारण दिले. तो म्हणाला, 'अन्य खेळाडू येथे रविवारपासून आहेत. त्यांनी पेसपेक्षा अधिक सराव केला आहे. रोहन आणि बालासोबत हे खेळाडू रोज तीन तीन सेट खेळत होते. पेस सरावात कालच दाखल झाला आणि केवळ तीन गेम खेळला आणि पावसाला सुरवात झाली. त्याचबरोबर दुहेरीच्या लढतीत अधिक दडपणही नाही. त्यामुळे पूर्ण विचारांती पेसला वगळण्याचा निर्णय घेतला.''

मायदेशात खेळण्याचा फायदा
संघाच्या आव्हानाविषयी बोलताना भूपती म्हणाला, 'घरच्या कोर्टवर खेळण्याचा फायदा आम्हाला होईल. कोर्ट वेगवान आहे. त्यामुळेच वेगवान सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. त्यांनी आठवडाभर येथे सराव केला असल्यामुळे ते येथील वातावरणात रुळले आहेत.'' इस्टोमिनची माघार हा उझबेकिस्तानला धक्का असेल, पण युकीच्या माघारीचा फारसा फरक भारतीय संघात पडणार नाही, असेही भूपतीने सांगितले. तो म्हणाला, ""इस्टोमिन हा उझबेकिस्तानची ताकद होता. तो न खेळणे हा त्यांच्यासाठी धक्का असेल. पण, युकी न खेळण्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध होते.''

प्रत्येक कर्णधाराची एक शैली असते. त्याच्या नियोजनाप्रमाणे संघाला दिशा मिळावी. कर्णधार म्हणून माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे खेळाडू कसे खेळतात हे पाहूयात.
- महेश भूपती

अशा होतील लढती
एकेरी (7 मार्च) - रामकुमार रामानाथन वि. तेमूर इस्माईलोव
प्रज्ञेश गुणेश्‍वरन वि. संजार फायझिएव
दुहेरी (8 मार्च) - रोहन बोपण्णा-श्रीराम बालाजी वि. फरुख डुस्तोव-संजार फायझिएव
एकेरी (9 मार्च) - रामानाथन वि. फायझिएव, गुणेश्‍वरन वि. इस्माईलोव