द्वितीय मानांकित हालेपशी मारिया शारापोवाची सलामी 

वृत्तसंस्था
Sunday, 27 August 2017

न्यूयॉर्क : वाइल्ड कार्ड मिळाल्यानंतर रशियाच्या मारिया शारापोवासाठी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा ड्रॉ मात्र खडतर ठरला. तिला पहिल्याच फेरीत रुमानियाच्या सिमोना हालेप हिच्याशी दोन हात करावे लागतील. हालेप जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. 

न्यूयॉर्क : वाइल्ड कार्ड मिळाल्यानंतर रशियाच्या मारिया शारापोवासाठी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा ड्रॉ मात्र खडतर ठरला. तिला पहिल्याच फेरीत रुमानियाच्या सिमोना हालेप हिच्याशी दोन हात करावे लागतील. हालेप जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. 

ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरल्यामुळे शारापोवाला 15 महिन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागले. बंदी संपल्यानंतर तिने पुनरागमन केले आहे. तिची ही पहिलीच ग्रॅंड स्लॅम स्पर्धा आहे. सिमोनाविरुद्ध तिने कारकिर्दीतील सर्व सहा लढती जिंकल्या आहेत. सिमोनाने गेल्या तीन महिन्यांत अव्वल क्रमांकाची संधी तीन वेळा दवडली. त्यामुळे ही स्पर्धा तिच्यासाठी महत्त्वाची असेल. गेल्या आठवड्यात सिनसिनाटीमधील स्पर्धेत स्पेनच्या गार्बीन मुगुरुझाविरुद्ध तिला 1-6, 0-6 असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. 

शारापोवा गेल्या चार वर्षांत तीन वेळा या स्पर्धेत भाग घेऊ शकली नाही. यापूर्वी ती 2014 मध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिने चौथी फेरी गाठली होती. 

अव्वल मानांकन असलेल्या चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोवासमोर पोलंडच्या मॅग्डा लिनेट्टी हिचे आव्हान असेल. ड्रॉनुसार कॅरोलिनाची उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवाशी लढत होऊ शकते. गतविजेत्या अँजेलिक केर्बरला सहावे मानांकन आहे. तिची जपानच्या नाओमी ओसाका हिच्याशी सलामी आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिची चौथ्या मानांकित एलिना स्विटोलिनाशी लढत होऊ शकते. 

तृतीय मानांकित गार्बीन आणि पाचवी मानांकित कॅरोलीन वॉझ्नीयाकी यांच्यात उपांत्यपूर्व सामना होऊ शकतो. वॉझ्नीयाकीसमोर पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या स्पर्धकाचे आव्हान असेल. गार्बीनची लढत अमेरिकेच्या वार्वला लेपचेन्को हिच्याशी आहे. 

व्हिनसलासुद्धा संधी 
अमेरिकेच्या 37 वर्षांच्या व्हिनस विल्यम्सला नववे मानांकन आहे. या स्पर्धेतून अव्वल क्रमांक मिळविण्याची संधी आठ जणींना आहे. यात व्हिनसचा समावेश आहे. तिची सलामी पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या स्पर्धकाशी असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news tennis news US Open Maria Sharapova