जोकोविच अन् त्याचे अनोखे गुरु

Novak Djokovic and his teacher
Novak Djokovic and his teacher

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने पॅरीस मास्टर्स स्पर्धेसाठी एका आगळ्यावेगळ्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांचे नाव होजे रुईझ इमाझ असे आहे. पेपे इमाझ म्हणून ते परिचीत आहेत.

व्यावसायिक टेनिस खेळलेली ही व्यक्ती स्पेनची असून ती अध्यात्मिक गुरु असल्याचे मानले जात आहे, पण स्वतः जोकोविचने गुरु हे विशेषण लावण्यास नकार दिला आहे.

जोकोविचचा सामना लक्झेम्बर्गच्या गिल्लेस मुल्लर याच्याशी होता. या लढतीच्यावेळी पेपे स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांनी घातलेल्या टी-शर्टवर समोरच्या बाजूला ह्रदयाचा आकार होता. पेपे यांनी जागतिक क्रमवारीत 146व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. 1998 मध्ये ते फ्रेंच ओपनमध्ये सहभागी झाले. ते कार्लोस मोयाकडून हरले. नंतर मोयाने विजेतेपद मिळविले होते. जागतिक क्रमवारीत पहिल्या दीडशे जणांत स्थान मिळविलेल्या टेनिसपटूचा दर्जा नक्कीच उल्लेखनीय असतो. पेपे 42 वर्षांचे असून ते स्पेनमधील मार्बेला येथे टेनिस सेंटर चालवितात.

त्यांची विचारसरणी वेगळी आहे. प्रेम आणि शांती ही दोन तत्वे ते मानतात. त्यांच्या अॅकॅडमीच्या वेबसाईटवरील माहिती उद्बोधक आहे.  ते म्हणतात की, हे सेंटर म्हणजे नेहमीसारखी अॅकॅडमी नाही. खेळाडूचे कल्याण, विचार आणि भावनेला आम्ही प्राधान्य देतो. खेळाडूचे टेनिसप्रमाणेच स्वतःवरील प्रेम सुद्धा पुन्हा निर्माण व्हायला हवे. त्यासाठी आम्ही खेळाडूंना मदत करतो.

या वेबसाईटवर एक व्हिडीओ सुद्धा आहे. अमोर वाय पाझ असे त्याचे नाव आहे. स्पॅनीश भाषेतील या शब्दांचा अर्थ प्रेम आणि शांती असा होतो. जोकोविचने त्यात ध्यानधारणा केल्याचे दिसून येते. त्यानंतर तो आनंद आणि एकोप्याचे महत्त्व विशद करतो. तो म्हणतो की, आपण सारे प्रेम, आनंद आणि एकोप्याच्या शोधात आहोत. आपण स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिले पाहिजे आणि दिव्य प्रकाशाच्या सहायाने या गोष्टींशी संबंध प्रस्थापित केला पाहिजे.

पॅरीसमधील लढतीनंतर मात्र जोकोविचने पत्रकार परिषदेत पेपे हे अध्यात्मिक गुरू असल्याचे मत खोडून काढले. पेपे यांनी पूर्ण जीवन टेनिसमध्ये घालविले आहे, असे त्याने निदर्शनास आणून दिले. काही मिडीयावाले गुरु हे विशेषण लावून स्टोरी रचण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा त्याने केला. ते आपल्याला कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करतात याचा तपशीलही त्याने दिला नाही.

मधला भाऊ मार्को याच्यासह ते आपल्या टीममध्ये आहेत. विशेष म्हणजे ते अनेक वर्षांपासून या टीमचा भाग असल्याचेही त्याने सांगितले. मार्को सुद्धा टेनिस खेळायचा, पण तो फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे त्याला नैराश्याने ग्रासले. पेपे यांच्या मार्गदर्शनामुळेच तो सावरू शकला.

जोकोविचसाठी यंदाचा मोसम विचीत्र ठरला आहे. ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन या पहिल्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा त्याने जिंकल्या. रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल यांच्या फॉर्मला ओहोटी लागल्यामुळे तसेच अँडी मरे आणि स्टॅन वॉव्रींका यांच्या कामगिरीत पुरेसे सातत्य नसल्यामुळे जोकोविचकडून बऱ्याच आशा होत्या. त्यातच यंदा रिओ ऑलिंपिकचे वर्ष असल्यामुळे तो गोल्डन स्लॅम करेल, म्हणजे ऑलिंपिक सुवर्णपदकासह उरलेल्या दोन आणि एकूण चार ग्रँड स्लॅम स्पर्धा सुद्धा जिंकेल असे त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर तज्ज्ञांना सुद्धा वाटत होते.

प्रत्यक्षात मोसमाचा उत्तरार्ध जोकोविचसाठी धक्कादायक ठरला. त्याला बिंबल्डनला तिसऱ्याच फेरीत सॅम क्युरीकडून पराभूत व्हावे लागले. यानंतर त्याने वैयक्तिक जीवनातील काही प्रश्नांमुळे खेळावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगितले होते. रिओ ऑलिंपिकमध्ये तो पहिल्याच फेरीत जुआन मार्टिन डेल पोट्रो याच्याकडून हरला. आता मोसमाच्या अंतिम टप्यात त्याचे अव्वल स्थानही धोक्यात आले आहे. ब्रिटनचा अँडी मरे त्याला मागे टाकू शकतो.

जोकोविचने मात्र अव्वल स्थान राखण्यासाठी जिद्द बळावली असल्याची जिगर व्यक्त केली आहे. या निर्णायक टप्यात जोकोविचला तांत्रिक नव्हे तर मानसिक आधाराची गरज वाटते. त्यामुळेच त्याने पेपे यांना पाचारण केले आहे.

दिर्घ काळापासूनच प्रशिक्षक मरियन वाज्दा आणि सुपर कोच बोरीस बेकर हे या स्पर्धेसाठी त्याच्याबरोबर नाहीत. जोकोविचच्या उत्तुंग यशात बेकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. साहजिकच जोकोविचने या स्पर्धेसाठी त्यांना न आणणे चर्चेचा विषय ठरले आहे. हा निर्णय संघ म्हणून घेण्यात आला असे जोकोविचने स्पष्ट केले आहे. संघ या शब्दाचा येथे वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. जोकोविच याच्यासारखे प्रमुख टेनिसपटू प्रशिक्षक, मॅनेजरच्या जोडीला फिजीओ, ट्रेनर, मॅस्यूअर, स्पोर्टस सायकॉलॉजीस्ट असा सपोर्ट स्टाफ ठेवते. त्यास टीम असे संबोधले जाते.

जोकोविचने कारकिर्दीत उत्तुंग कामगिरी करण्यासाठी नेहमीच सर्वोत्तम  प्रयत्न केले आहेत. त्याने एका भारतीय डॉक्टरकडून होमिओपॅथीचे उपचारही घेतले होते. मोसमाचा उत्तरार्ध खराब गेल्यानंतरही जोकोविचसाठी अव्वल स्थान राखणे महत्त्वाचे आहे. मोसमाअखेरच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान राखल्यास त्याच्यासाठी ती एक महत्त्वाची कामगिरी ठरेल. याचा निर्णय कदाचित पॅरीसमधील स्पर्धेतच लागेल. यामुळेच गुरु पेपे यांचे मार्गदर्शन जोकोविचला फलदायी ठरणार का याची उत्सुकता टेनिसप्रेमींना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com