मी आणि फेडरर अजून संपलेलो नाही: नदाल 

वृत्तसंस्था
Thursday, 20 October 2016

माद्रिद: 'टेनिस कसे खेळायचे, हे मी आणि रॉजर (फेडरर) विसरलेलो नाही. टेनिसमधील सर्वोच्च पातळीवर पुन्हा परतण्यासाठी आम्ही दोघेही मेहनत घेत आहोत,' अशी प्रतिक्रिया देत स्पेनचा अनुभवी टेनिसपटू राफेल नदालने 'आम्ही अजून संपलेलो नाही' असेच संकेत दिले. स्पेनमधील मालोर्का या शहरात नदालच्या टेनिस अकादमीचे काल (बुधवार) रॉजर फेडररच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यावेळी नदालने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 

दुखापती आणि हरपलेला सूर यामुळे नदाल आणि फेडरर हे दोघेही अनुभवी खेळाडू गेल्या 13 वर्षांत प्रथमच जागतिक क्रमवारीतील 'टॉप 4'मधून बाहेर गेले आहेत. त्यांचे वाढते वय पाहता ग्रॅंड स्लॅममध्ये धडाक्‍यात पुनरागमन करणे त्यांच्यासाठी अवघड आहे, असेही मानले जात आहे. गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर रॉजर फेडरर अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी तो कुठल्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही. नदाल तंदुरुस्त झाला असला, तरीही 2016 मध्ये स्पर्धात्मक टेनिस खेळणार की नाही, याविषयी त्याने मौन बाळगले. 

नदाल म्हणाला, "कधी कधी सतत खेळणे हा अपयशावरील तोडगा असू शकत नाही. काही काळ 'ब्रेक' घेणे आणि सराव करणे, हे त्यावरील उत्तर असू शकते. मी अजूनही काही वर्षे टेनिस खेळू शकतो. पण निवृत्तीनंतरही काही योजना आखणे आवश्‍यक असते आणि ही टेनिस अकादमी त्याच योजनेचा भाग आहे. या अकादमीतून केवळ उत्तम खेळाडूच नव्हे, तर उत्तम माणूस घडविण्याचे आमचे ध्येय आहे.'' 

नदालच्या अकादमीमध्ये 26 क्‍ले-कोर्ट, 10 ग्रास-कोर्ट, दोन जलतरण तलाव आणि फिटनेस सेंटर अशा सुविधा आहेत. विशेष म्हणजे, 'माझ्या मुलांना टेनिस शिकायचे असेल, तर मी त्यांना इथेच पाठविणार आहे,' असे नदालचा कोर्टवरील प्रतिस्पर्धी आणि मित्र रॉजर फेडररने जाहीरही केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roger Federer and I haven't forgotten how to play tennis, says Rafael Nadal