फेडररच 'ड्रीम फायनल'चा विजेता

Roger Federer
Roger Federer

मेलबर्न - बिनतोड सर्व्हिस, फोरहँड व बॅकहँडचे आक्रमक फटके अन् प्रेक्षकांकडून मिळणारा पाठिंबा याच्या जोरावर टेनिसचे एक युग गाजविलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने या वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. फेडररने मातब्बर रॅफेल नदालचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

अनेक मातब्बर स्पर्धकांचे शिरकाण झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीची सांगता फेडरर आणि नदाल या ड्रीम फायनलने झाली. रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल या समकालीन प्रतिस्पर्ध्यांमध्ये मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची फायनल पाहणे हे जगभरातील टेनिसप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी होती. नदालने शुक्रवारी बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमीत्रोवचे आव्हान पाच सेटमध्ये परतावून लावले, तर फेडररने गुरुवारी स्टॅन वॉव्रींकावर पाच सेटमध्येच मात करत अंतिम फेरी गाठली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला अँडी मरे आणि नोव्हाक जोकोविच यांच्या पराभवामुळे फेडरर आणि नदाल यांच्यातील अंतिम फेरीचे वेध लागले होते. या मार्गातील अखेरचा टप्पा पार करताना दोघांनी पूर्वीसारखाच जिगरबाज खेळ केला. 

पहिल्या सेटमध्ये फेडररने सुरवातीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. त्याला फायदा त्याला नदालची सर्व्हिस ब्रेक करण्यात झाला आणि त्याने पहिला सेट 6-4 असा आपल्या नावावर केला. नदालने दुसऱ्या सेटमध्ये फेडररला कडवी लढत देत 3-0 अशी आघाडी घेतली होती. अखेर नदालने दुसऱ्या सेटमध्ये 6-3 असा विजय मिळवीत बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये फेडररच्या बिनतोड सर्व्हिस आणि बॅकहँडच्या फटक्यांमुळे नदालकडून चुका झाल्या आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाल्याचे पहायला मिळाले. अखेर फेडररने तिसऱ्या सेटमध्ये 6-1 असा विजय मिळवीत आघाडी घेतली. 

फेडररने एक सेट जिंकला की पुढच्या सेटमध्ये लगेच त्याच्यावर नदालने मात केली. त्यामुळे दोघांच्या समर्थकांना चेव आणणारा आणि अतिशय उत्कंठा ताणणारा असा हा सामना ठरला. 

फेडररने 6-4, 6-1 असे सेट जिंकले, तर नदालने 6-3, 6-3 अशी त्याच्यावर मात केली. दोघांनी दोन सेट जिंकल्यामुळे पाचव्या सेटमध्ये प्रचंड 'थ्रिलिंग' खेळाचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. या सेटमध्ये पहिल्यांदा आघाडी घेतलेल्या नदालवर फेडररने नंतर चढाई करीत 4-3 अशी आघाडी मिळवली. त्यावर नदाल कितपत शह देतो याकडे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर फेडररने अतिशय सावध आणि अचूक खेळी केल्याने नदालवर मानसिक दबाव टाकण्यात तो यशस्वी झाल्याचे दिसत होते. मात्र, नदालने चिवट खेळी करीत गुण मिळविण्याचा अतोनात प्रयत्न केला. परंतु आपल्या खास ठेवणीतले हुकमी फटके खेळत फेडररने ऐनवेळी सलग 3 गुण मिळवत 6-3 अशी आघाडी घेऊन बाजी मारली.
 

रोझवालनंतर दुसरा
फेडरर 35 वर्षांचा आहे. केन रोझवालने 1974च्या अमेरिकन ओपनमध्ये 39 वर्षे आणि 310 दिवसांचा असताना अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर फेडरर ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा जास्त वयाचा दुसराच टेनिसपटू ठरला.

चौघांचे वय तिशीपेक्षा जास्त
एकेरीत पुरुष आणि महिला या दोन्ही विभागांमध्ये अंतिम फेरी गाठलेले स्पर्धक तिशीपेक्षा जास्त वयाचे आहेत. 2008च्या विंबल्डन स्पर्धेनंतर असे प्रथमच घडले आहे. तेव्हा विल्यम्स भगिनींमध्ये लढत झाली होती, तसेच फेडरर विरुद्ध नदाल असाच सामना झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com