esakal | फ्रेंच ओपनमधून फेडररची माघार
sakal

बोलून बातमी शोधा

Roger Federer

दृष्टिक्षेपात 

  • यंदाच्या मोसमात फेडररचा चार स्पर्धांत सहभाग 
  • परंपरागत प्रतिस्पर्धी नदालला हरवून ऑस्ट्रेलियन विजेतेपद 
  • दुबईतील स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत रशियाच्या येवगेनी डॉनस्कॉयकडून पराभूत 
  • मास्टर्स 1000 मालिकेतील दोन स्पर्धांत विजेतेपद 
  • इंडियन वेल्समध्ये अंतिम फेरीत स्टॅन वॉव्रींकावर मात 
  • मायामीतील स्पर्धेच्या निर्णायक लढतीत नदालला यशस्वी शह 
  • यंदा 19 विजय आणि एक पराभव अशी कामगिरी

फ्रेंच ओपनमधून फेडररची माघार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पॅरिस : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आगामी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. 28 मे ते 11 जूनदरम्यान ही स्पर्धा होईल. कारकिर्दीचा कालावधी वाढावा, या उद्देशाने यंदाच्या मोसमात क्‍ले कोर्टवर खेळण्याचे टाळायला हवे असे त्याला वाटते. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. तो विंबल्डनच्या तयारीला प्राधान्य देणार आहे. 

फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून मोसमाला सनसनाटी प्रारंभ केला. या स्पर्धेसह तो केवळ चार स्पर्धांत सहभागी झाला आहे. यात त्याने तीन विजेतीपदे मिळविली.

ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना त्याने कट्टर प्रतिस्पर्धी रॅफेल नदालला हरविले. गेल्या वर्षी दुखापतीमुळे फेडररला या स्पर्धेत खेळता आले नव्हते. त्याने सांगितले की, गेल्या महिन्यात मी कोर्टवर बराच सराव केला; तसेच जिममध्येही मेहनत केली. 'एटीपी टूर'वर आणखी खूप वर्षे खेळायचे असेल तर यंदा क्‍ले कोर्ट मोसमात माघार घेणेच चांगले ठरेल. माझे आणि माझ्या 'टीम'चे हेच मत पडले. मी ग्रास कोर्ट; तसेच हार्ड कोर्ट मोसमांवर लक्ष केंद्रित करेन. माझ्यासाठी मोसमाची सुरवात जादुई झाली; पण कारकिर्दीचा कालावधी वाढवायचा असेल तर मला वेळापत्रक विचारपूर्वक आखावे लागेल. क्‍ले कोर्टवर एकच स्पर्धा खेळणे उर्वरित मोसमाच्या तयारीसाठी आणि माझ्या खेळासाठी चांगले ठरणार नाही. 

फेडररने 2009 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तो जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. या आठवड्यात नदालने माद्रिदमधील स्पर्धा जिंकून त्याला मागे टाकले. विंबल्डन तीन जुलैपासून सुरू होणार आहे. फेडररने सात वेळा विंबल्डन जिंकले आहे.