साईना, श्रीकांतचा सफाईदार विजय 

Saina, Srikanth
Saina, Srikanth

नानजिंग (चीन) / मुंबई : साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम जोशात सुरू करताना झटपट विजय मिळविला. साईनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांच्या विजयामुळे सर्वच एकेरीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत विजय मिळविला. 

जागतिक स्पर्धेत यापूर्वी रौप्य आणि ब्रॉंझ जिंकलेल्या साईनाने तुर्कीच्या ऍलिये देमिरबॅग हिला 21-17, 21-8 असे हरवले. काहीशा अडखळत्या सुरवातीनंतर साईनाने बाजी मारली; पण श्रीकांतने केवळ 37 मिनिटांत आयर्लंडच्या न्हात गुयेन याला 21-15, 21-16 असे हरवले. साईनासमोर आता 2013 च्या विजेत्या रॅचनॉक इनतॉन हिचे खडतर आव्हान असेल. इनतॉनला तीन गेमच्या लढतीस सामोरे जावे लागले; तसेच दुसऱ्या गेममध्ये ती 16-19 मागे होती. याच वेळी तिने दुखावलेल्या घोट्यावर उपचार करून घेतले; मात्र त्यानंतर तिचा खेळ बहरला आणि तिने सव्वा तासाच्या लढतीत बाजी मारली. 

साईनाची सुरवात खराब होती, तिची सर्व्हिस बरोबर होत नव्हती, त्यामुळे ती मागे पडली. त्यातच चुकांमुळे साईनाला प्रसंगी घेतलेली आघाडीही राखता येत नव्हती. या गेमच्या उत्तरार्धात साईनाने रॅलीज जिंकत 17-14 अशी आघाडी घेतली आणि गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धीच्या आक्रमक खेळास तोडीस तोड उत्तर साईनाने दिले. तिचे ड्रॉप्स प्रभावी ठरले आणि हा गेम एकतर्फी झाला. 
श्रीकांतचा कस क्वचितच लागला. त्याने झटपट सहा गुणांची आघाडी घेतली; पण त्यानंतर तो काहीसा गाफील झाला, त्यामुळे त्याच्या चुका झाल्या. अचानक 15-14 अशी चुरस निर्माण झाली; पण याच वेळी श्रीकांतने सलग सहा गुण घेतले. दुसऱ्या गेममध्ये सुरवातीस चुरस झाली; पण ब्रेकला असलेल्या 11-9 आघाडीनंतर श्रीकांतचे आक्रमण यशस्वी ठरले. या गेममध्येही त्याने अंतिम टप्प्यात सलग सहा गुण जिंकले होते. 

भारतीयांचे आजचे आव्हान 
- सिंधूची प्रतिस्पर्धी इंडोनेशियाची फित्रियानी जागतिक क्रमवारीत 41 वी. 
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या सिंधूचा दोघींतील यापूर्वीच्या चारही लढतीत विजय. 
- समीर वर्मासमोर लिन दानचे आव्हान. जागतिक क्रमवारीत लीन नववा, तर समीर 19 वा. दोघांतील एकमेव लढतीत लीन दानची सरशी. 
- किदाम्बी श्रीकांतचा (6) प्रतिस्पर्धी अबियान पाब्लो (स्पेन) जागतिक क्रमवारीत 48 वा. प्रतिस्पर्ध्यांतील पहिलीच लढत. 
- बी साई प्रणीत (26) याचाही प्रतिस्पर्धी स्पॅनिश (लुईस एन्रीक पेनाल्वर - 115). दोघांतील ही पहिलीच लढत. 
- एच. एस. प्रणॉयची (11) लढत ब्राझीलच्या गॉर कोएल्हो (39) याच्याविरुद्ध. दोघांतील हा पहिलाच सामना. 

अश्विनी - सात्त्विकचा चमकदार विजय 
अश्‍विनी पोनप्पा - सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांनी मिश्र दुहेरीत पहिला गेम गमावल्यावर बाजी मारली, त्याचबरोबर या दोघांनी अनुक्रमे महिला (सिक्की रेड्डी) आणि पुरुष (चिराग शेट्टी) दुहेरीतही आगेकूच केली. उर्वरित लढतीत भारतीय अपयशी ठरले. 
अश्‍विनी- सात्त्विकने पंधराव्या मानांकित जर्मनी जोडीस 10-21, 21-17, 21-18 असे हरवले. त्यांची आता लढत सातव्या मानांकित जोडीविरुद्ध होईल. सात्त्विक- चिरागने राष्ट्रकुल विजेत्या; तसेच ऑलिंपिक ब्रॉंझ विजेत्या इंग्लंड जोडीस तीन गेममध्ये हरवले. भारतीय जोडीने 81 मिनिटांत विजय मिळविला. अश्विनी- सिक्कीच्या साथीत महिला दुहेरीत तैवानच्या जोडीस पहिला गेम गमावल्यावर हरवले. 

एन. सिक्की - प्रणव जेरी चोप्रा, मेघना जाक्कामपुडी - पूर्वषा एस राम, तरुण कोना - सौरभ शर्मा, एम. आर. अर्जुन - श्‍लोक रामचंद्रन, तसेच रोहन कपूर - कुहू गर्गचे आव्हान आटोपले आहे. अर्थात, या सर्वांनीच अखेरपर्यंत चांगली लढत दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com