सानिया-बार्बराचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 April 2017

 

 

मायामी, फ्लोरिडा - भारताची सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ताकाची बार्बरा स्ट्रीकोवा यांना मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. कॅनडाची गॅब्रिएला डॅब्रोस्की आणि चीनची झू यिफान यांच्या बिगरमानांकित जोडीने त्यांना 6-4, 6-3 असे हरविले. हा सामना एक तास आठ मिनिटे चालला. गॅब्रिएला आणि यिफान पूर्वी एकदाही प्रतिस्पर्धी किंवा जोडीदार म्हणून एकाच कोर्टवर खेळल्या नव्हत्या. या स्पर्धेसाठी मात्र त्यांनी या स्पर्धेच्या कालावधीत कसून सराव केला. त्यांनी आठव्या मानांकित अबीगैल स्पीअर्स-कॅटरीना स्रीबॉटनिक यांना हरविले होते. त्यांनी पहिल्या चार पैकी तीन मानांकित जोड्यांना हरविले. द्वितीय मानांकित एकातेरीना माकारोवा-एलेना व्हेस्नीना, चौथ्या मानांकित अँड्रीया हॅलावाच्कोवा-शुआई पेंग आणि तृतीय मानांकित सानिया-बार्बरा अशा जोड्यांना त्यांनी धक्के दिले.

सानिया-बार्बरा यांनी सुरवातीलाच ब्रेक मिळविला, पण त्यानंतर गॅब्रिएला-यिफान यांनी नऊ पैकी आठ गेम जिंकले. यामुळे पहिला सेट जिंकण्याबरोबरच त्यांना 4-1 अशी आघाडी मिळाली.

सानियाने बार्बराच्या साथीत यंदा दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. मोसमाच्या प्रारंभी त्यांनी सिडनीतील स्पर्धेत ही कामगिरी केली होती, पण त्यांना टीमिया बॅबोस (हंगेरी)-अनास्ताशिवाय पावल्यूचेन्कोवा (रशिया) यांनी हरविले होते. सानियाने अमेरिकेच्या बेथानी मॅट्टेक-सॅंड्‌स हिच्या साथीत ब्रिस्बेनमधील स्पर्धा जिंकली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sania Mirza-Barbara Strycova defeat