esakal | रॉजर फेडररचे विक्रमी सहावे विजेतेपद
sakal

बोलून बातमी शोधा

रॉजर फेडररचे विक्रमी सहावे विजेतेपद

रॉजर फेडररचे विक्रमी सहावे विजेतेपद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेलबर्न - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने टेनिस विश्‍वावरील आपली हुकूमत पुन्हा एकदा सिद्ध केली. फेडररने रविवारी क्रोएशियाच्या मरिन चिलीच याचा संघर्षपूर्ण लढतीत ६-२, ६-७(५-७), ६-३, ३-६, ६-१ असा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. कारकिर्दीमधील त्याचे हे २०वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.

‘एजलेस वंडर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेडररने वयाच्या ३६व्या वर्षी विजेतेपद मिळविले. त्याने अंतिम लढतीत ३ तास ३ मिनिटांच्या लढतीत २९ वर्षीय चिलीचचे आव्हान परतवून लावले. येथील अत्यंत उष्ण हवामानात फेडररने आपल्या खेळाने उदयोन्मुख खेळाडूंसमोर तंदुरुस्तीचे उदाहरणच ठेवले. पहिला सेट त्याने २४ मिनिटांत जिंकला; पण त्यानंतर सहाव्या मानांकित चिलीचने प्रथमच ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना फेडररसमोर जबरदस्त आव्हान उभे केले. दुसऱ्या सेटमध्ये त्याने १-१, २-२, ४-४ अशा बरोबरीच्या स्थितीत ब्रेक पॉइंट वाचवले. त्यानंतर टायब्रेकमध्ये ताकदवान फोरहॅंडच्या फटक्‍याने त्याने सेट जिंकत बरोबरी साधली. 

फेडररने नंतर एक ब्रेक पॉइंट साधत तिसरा सेट जिंकला; पण चौथ्या गेमला चिलीचने पुन्हा एकदा फेडररला निष्प्रभ केले. चौथा सेट जिंकल्यावर चिलीच अधिक धोकादायक वाटू लागला. निर्णायक सेटमध्ये मात्र चिलीच दडपणाचा सामना करू शकला नाही. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त पाठिंब्याच्या जोरावर ब्रेक पॉइंटचा अडथळा दूर करत फेडररने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

बोपण्णा-बाबोस उपविजेते
मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची हंगेरीची जोडीदार तिमेआ बाबोस यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत त्यांना मेट पॅविच-गॅब्रिएला डॅब्रोवस्की या जोडीकडून ६-२, ४-६, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. ही लढत १ तास ८ मिनिटे चालली. पहिल्या सेटमध्ये पॅविच-ड्रबोवस्की जोडीला सर्व्हिसने दगा दिला; तर दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा-बाबोस यांना सर्व्हिसवर नियंत्रण राखता आले नाही. टायब्रेकरमध्ये मोक्‍याच्या क्षणी पॅविच-ड्रॅबोवस्की यांनी बाजी मारली. बोपण्णाने गेल्या वर्षी डॅब्रोवस्कीच्या साथीत फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळविले होते.

loading image